त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले.
मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान यरुशलेमेला आला; हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता.
एका खांबाची उंची अठरा हात असून त्यावर पितळेचा कळस होता; त्या कळसाची उंची तीन हात होती; त्या कळसाच्या सभोवार पितळेची जाळी व डाळिंबे केली होती; दुसर्या खांबालाही असेच जाळीचे काम होते.
योद्ध्यांवर नेमलेल्या एका खोजाला त्याने नगरातून पकडून नेले; राजाच्या हुजुरास असणारे पाच पुरुष त्याला शहरात आढळले त्यांनाही त्याने नेले; त्याप्रमाणेच लोकांची सैन्यात भरती करणारा सेनापतीचा चिटणीस आणि नगरात सापडलेल्या लोकांपैकी साठ माणसे ह्यांना त्याने नेले.
बाबेलच्या राजाने गदल्यास सुभेदार नेमले हे सेनानायकांनी व त्याच्या लोकांनी ऐकले, तेव्हा इश्माएल बिन नथन्या, योहानान बिन कारेह, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी आणि याजन्या बिन माकाथी व त्यांचे सर्व पुरुष मिस्पा येथे गदल्या ह्याच्याकडे आले.
तेव्हा गदल्या आणभाक करून त्यांना व त्यांच्या माणसांना म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्यांची भीती धरू नका; देशात राहून बाबेलच्या राजाचे अंकित व्हा, म्हणजे तुमचे बरे होईल.”
सातव्या महिन्यात राजवंशातला इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा ह्याने दहा माणसांसह येऊन गदल्याला ठार मारले; तसेच मिस्पा येथे त्याच्याबरोबर असलेले यहूदी व खास्दी ह्यांनाही त्याने ठार मारले.
यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याच्या बंदिवासाच्या सदतिसाव्या वर्षी म्हणजे ज्या वर्षी बाबेलचा राजा अबील-मरोदख राजा झाला, त्याच्या बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याला कारागृहातून काढून त्याचा सत्कार केला.