×

पवित्र शास्त्र RV (Re-edited)

१ इतिहास २०

1
राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी यवाबाने आपले सैन्यबळ घेऊन अम्मोनी लोकांचा मुलूख उद्ध्वस्त केला आणि मग येऊन राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमातच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर मारा करून ते उद्ध्वस्त केले.
2
दाविदाने त्या लोकांच्या राजाच्या2 मस्तकांवरून मुकुट काढला; त्याचे वजन एक सोन्याचा किक्कार आहे असे त्याला कळून आले; तो रत्नजडित होता; तो दाविदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली.
3
त्याने त्या नगराच्या रहिवाशांना बाहेर काढून करवती, लोखंडी दाताळी व कुर्‍हाडी ह्यांनी कापले.3 अम्मोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने तसेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमास परत आला.
4
ह्यानंतर पलिष्ट्यांशी गेजेर येथे पुन्हा युद्ध झाले; त्या प्रसंगी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सिप्पय ह्याला जिवे मारले तेव्हा ते लोक शरण आले.
5
पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा याइराचा पुत्र एलहानान ह्याने गथकर गल्याथ ह्याचा भाऊ लहमी ह्याचा वध केला; गल्याथाच्या भावाची काठी साळ्याच्या तुरीएवढी होती.
6
गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता, त्याच्या प्रत्येक हातास व पायास सहा-सहा अशी एकंदर चोवीस बोटे होती.
7
त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला.
8
हे पुरुष गथ गावी रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या सेवकांच्या हाताने पडले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide
:
टिपा जतन करा