इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वांना दावीदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलवून घेतले. देवाचे मंदिर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले.
दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.
पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यामध्ये पुष्कळ रक्त पाडले. तेव्हा तुला माझ्यासाठी मंदिर बांधता येणार नाही. कारण तू माझ्यापुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे.
मात्र तुला पुत्र होईल तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या सर्व शत्रूपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन. कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्राएलांस त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन.
पाहा, परमेश्वराच्या मंदिरासाठी मी खूप कष्टाने एक लक्ष किक्कार सोने आणि दहा लक्ष किक्कार रुपे आणि पितळ व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून तयारी केली आहे. मी दगड, लाकूडसुध्दा पुरवले आहे. तू या सर्वात अधिक भर घाल.
“तुमचा देव परमेश्वर तुम्हासोबत आहे. आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हास शांतता दिली आहे. कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत, परमेश्वराच्यापुढे आणि त्याच्या लोकांच्या आता हा देश ताब्यात आला आहे.
तेव्हा आता अंत:करणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. कारण परमेश्वराच्या नावासाठी जे मंदिर बांधायचे आहे त्यामध्ये मग परमेश्वराच्या कराराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”