एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यामध्ये वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.
शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा पुत्र जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा समजदार मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.
अलियेजराकडून त्याचे भाऊबंद: अलियेजाराचा पुत्र हा रहब्या होता. रहब्याचा पुत्र यशया. यशयाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र जिख्री. आणि जिख्रीचा पुत्र शलोमोथ.
दावीद राजा व पित्याच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते.
शमुवेल संदेष्टा, कीशचा पुत्र शौल आणि नेरचा पुत्र अबनेर, सरुवेचा पुत्र यवाब यांनी परमेश्वरास समर्पित केलेल्या प्रत्येक पवित्र वस्तूंचे रक्षणही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.
हेब्रोनी वंशातला, हशब्या व त्याचे भाऊबंद, एक हजार सातशे शूर वीर, यार्देनेच्या अलिकडे पश्चिमेस, परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्राएलावर देखरेख करत होते.
हेब्रोनी यांच्या वंशातला यरीया हा त्यांच्या वंशाचा प्रमुख होता, त्याच्या घराण्यावरुन त्याची मोजणी केली. दावीदाच्या राज्याच्या कारकिर्दीच्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा तपास केला आणि त्यांना गिलाद मधल्या याजेर नगरात कर्तबगार अशी माणसे आढळली.
आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे दोन हजार सातशे नातलग यरीयाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज यासाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे दोन हजार सातशे जण दावीदाने नेमले.