तेव्हा रहबाम व यहूदाचे सरदार शिशकाच्या भीतीने यरुशलेमेत एकत्र मिळाले असता त्यांच्याकडे शमाया संदेष्टा येऊन म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘तुम्ही मला सोडले म्हणून मीही तुम्हांला सोडून तुम्हांला शिशकाच्या हाती दिले आहे.”’
ते दीन झाले आहेत असे परमेश्वराने पाहिले तेव्हा परमेश्वराचे वचन शमायास प्राप्त झाले की, “ते दीन झाले आहेत म्हणून मी त्यांचा नाश करणार नाही; मी लवकरच त्यांचा बचाव करीन; माझ्या क्रोधाचा वर्षाव शिशकाच्या हस्ते मी यरुशलेमेवर करणार नाही.
मिसर देशाचा राजा शिशक ह्याने यरुशलेमेवर स्वारी केली; त्याने परमेश्वराच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले; शलमोन राजाने ज्या सोन्याच्या ढाली केल्या होत्या त्याही त्याने नेल्या.
रहबाम दीन झाला तेव्हा परमेश्वराचा त्याच्यावरचा कोप शमला; त्याने त्याचा पुरा नाश केला नाही; शिवाय यहूदाच्या ठायी काही चांगल्या गोष्टी अद्यापि राहिल्या होत्या.
ह्या प्रकारे रहबाम राजाने यरुशलेमेत आपली मजबुती करून तेथे राज्य केले; रहबाम राज्य करू लागला तेव्हा तो एकेचाळीस वर्षांचा होता, व परमेश्वराने आपल्या नामाच्या निवासासाठी म्हणून जे यरुशलेम नगर सर्व इस्राएल वंशांतून निवडून घेतले होते तेथे त्याने सतरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव नामा; ती अम्मोनीण होती.
रहबामाची अथपासून इतिपर्यंतची कृत्ये शमाया संदेष्टा व इद्दो द्रष्टा ह्यांच्या बखरीत वंशावळ्यांच्या क्रमानुसार लिहिलेली आहेत, नाहीत काय? रहबाम व यराबाम ह्यांच्या नेहमी लढाया चालू असत.