मग परमेश्वराने यरुशलेमेस मोरिया डोंगरावर शलमोनाचा बाप दावीद ह्याला दर्शन दिले होते त्या अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात दाविदाने नेमलेल्या स्थानी मोरिया डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शलमोनाने सुरू केले.
मंदिराच्या मोठ्या भागाच्या छतास त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी केली; ती त्याने शुद्ध सोन्याने मढवली; तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्या ह्यांची नक्षी काढली.
मग त्याने मंदिराचे परमपवित्रस्थान तयार केले; त्याची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती; त्याची रुंदी वीस हात होती; त्याने ते सहाशे किक्कार1 शुद्ध सोन्याने मढवले.
करूबांचे पंख एकंदर वीस हात लांब होते; प्रत्येक करूबाचा एक पंख पाच हात लांब असून तो मंदिराच्या भिंतीला लागला होता, त्याचा दुसरा पंख पाच हात लांब असून तो दुसर्या करूबाच्या पंखाला लागला होता.
दुसर्या करूबाचाही एक पंख पाच हात लांब असून मंदिराच्या दुसर्या भिंतीला लागला होता, आणि दुसरा पंखही पाच हात लांब असून पहिल्या करूबाच्या पंखाला जडला होता.
हे खांब त्याने मंदिरासमोर, एक उजव्या बाजूस व दुसरा डाव्या बाजूस असे उभे केले; उजव्या बाजूच्या खांबाचे नाव याखीम (तो स्थापील) व डाव्या बाजूच्या खांबाचे नाव बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे होते.