ह्या प्रकारे जे काही काम परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनाने हाती घेतले ते सर्व समाप्त झाले. मग आपला बाप दावीद ह्याने समर्पित केलेले सोने, चांदी व सर्व पात्रे शलमोनाने आत आणून देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
मग शलमोनाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे अर्थात सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व मुख्य, आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे सरदार ह्यांना यरुशलेमेत जमा केले.
शलमोन राजा व त्याच्याजवळ जमलेली सर्व इस्राएल मंडळी ह्यांनी कोशापुढे शेरडामेंढरांचे व गुराढोरांचे इतके बली अर्पण केले की त्यांची संख्या सांगता किंवा मोजता आली नाही.
मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश त्याच्या स्थानी म्हणजे मंदिराच्या गाभार्यात परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या नेमलेल्या ठिकाणी नेऊन ठेवला.
इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबात मोशेने ह्या कोशात दोन पाट्या ठेवल्या होत्या; त्याखेरीज त्यात दुसरे काही नव्हते.
जितके लेवी गाणारे होते, म्हणजे अर्थात आसाफ, हेमान व यदूथून, तितके सगळे आपल्या पुत्रांसह व भाऊबंदांसह सणाची वस्त्रे लेऊन झांजा, सारंग्या व वीणा घेऊन वेदीच्या पूर्व बाजूस उभे राहिले व त्यांच्याबरोबर एकशे वीस याजक कर्णे वाजवत होते.
कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले; ती अशी: “तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.” तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.