यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली; तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फर्मानही पाठवले, ते असे:
“पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गींचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध;
त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल - त्याच्याबरोबर त्याचा देव असो - त्याने यहूदातील यरुशलेमेस जाऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधावे; यरुशलेमेत जो आहे तोच देव होय.
जो कोणी शेष राहिला असून एखाद्या ठिकाणी उपरा म्हणून राहत असेल, त्याला तेथल्या माणसांनी चांदी, सोने, सामानसुमान व पशू देऊन साहाय्य करावे; ह्याखेरीज यरुशलेमेतील देवाच्या मंदिराकरता त्यांनी स्वसंतोषाची अर्पणे द्यावीत.” पाडाव करून नेलेले यरुशलेमेस परत येतात
तेव्हा यरुशलेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जाण्यास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहूदा व बन्यामीन ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक व लेवी उठून सिद्ध झाले.
त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामानसुमान, पशू व मोलवान वस्तू देऊन त्यांना साहाय्य केले; ह्यांखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच.