|
| 1 |
|
| मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले: |
|
| 2 |
|
| “मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का? अत्यंत सुज्ञ मनुष्याचा सुद्धा त्यांना काय लाभ? |
|
| 3 |
|
| जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद? तू निर्दोष असलास, तरी त्यांना काय लाभ होणार? |
|
| 4 |
|
| “तू भक्त आहेस म्हणून परमेश्वर तुझा निषेध आणि तुझ्याविरुद्ध आरोप करीत आहेत का? |
|
| 5 |
|
| तुझी दुष्टता पुष्कळ नाही का? तुझे अपराध अनंत नाही का? |
|
| 6 |
|
| तू निष्कारण आपल्या नातेवाईकांकडून गहाण घेतलेस; आणि लोकांना वस्त्राशिवाय सोडले. |
|
| 7 |
|
| थकलेल्यांना तू पाणी दिले नाही आणि तू भुकेल्यांपासून अन्न राखून ठेवलेस, |
|
| 8 |
|
| जरी तू प्रभावी व्यक्ती, एक जमीनदार होतास; सन्माननीय मनुष्य असा त्या भूमीवर राहत होतास |
|
| 9 |
|
| आणि तू विधवांना रिकाम्या हाती घालवून दिले तसेच अनाथांना बलहीन केलेस. |
|
| 10 |
|
| म्हणूनच आता पाश तुझ्या सभोवती आहे, अकस्मात आलेली संकटे तुला का भयभीत करतात, |
|
| 11 |
|
| इतका अंधकार का आहे की तुला दिसत नाही, आणि जलांच्या पुराने तुला का झाकून टाकले आहे. |
|
| 12 |
|
| “परमेश्वर उच्चतम स्वर्गामध्ये नाहीत काय? आणि अतिउंच असलेल्या त्या तार्यांकडे बघ! |
|
| 13 |
|
| पण तरीही तू म्हणतोस, ‘परमेश्वराला काय माहीत? निबिड अंधकारातून ते न्याय करतील काय? |
|
| 14 |
|
| ते जेव्हा घुमटकार नभोमंडळात चालतात तेव्हा त्यांनी आम्हाला बघू नये म्हणून दाट ढगांनी त्यांच्यावर पडदा टाकला आहे.’ |
|
| 15 |
|
| पुरातन मार्ग जे दुष्टांनी पत्करले होते त्यावर अजून किती काळ तू चालशील? |
|
| 16 |
|
| ते तर त्यांच्या नेमीत वेळेच्या आधी उठविले गेले, त्यांच्या जीवनाचा पाया पुराच्या जलात वाहून गेला. |
|
| 17 |
|
| ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा! सर्वसमर्थ आमच्यासाठी काय करणार?’ |
|
| 18 |
|
| तरीही परमेश्वराने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली, म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर राहतो. |
|
| 19 |
|
| नीतिमान दुष्टांचा नाश झालेला पाहून हर्ष करतील; निर्दोष लोक त्यांचा उपहास करतील, |
|
| 20 |
|
| ते म्हणतील, ‘खचितच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे, अग्नीने त्यांची संपत्ती भस्म केली आहे.’ |
|
| 21 |
|
| “परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर; म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल. |
|
| 22 |
|
| त्यांच्या मुखातून आलेल्या आज्ञा स्वीकारून घे त्यांचे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेव. |
|
| 23 |
|
| जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्यातून दुष्टता काढून टाकशील: तर तू पुनर्स्थापित होशील. |
|
| 24 |
|
| जर तू आपले सोने धुळीत मिळवशील, आणि तुझे ओफीराचे सोने नदीच्या गाळात टाकून देशील, |
|
| 25 |
|
| तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने, आणि तुझे मौल्यवान रुपे होतील. |
|
| 26 |
|
| मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्ये आनंद पावशील व आपली दृष्टी परमेश्वराकडे वर लावशील. |
|
| 27 |
|
| तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, आणि तुझे नवस तू फेडशील. |
|
| 28 |
|
| ज्याची तू इच्छा धरशील, ते घडून येईल, आणि तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. |
|
| 29 |
|
| जेव्हा लोकांना नीच केले जाते तेव्हा तू म्हणशील, ‘त्यांना उचलून धर!’ जे पडलेले ते वाचविले जातील. |
|
| 30 |
|
| आणि जे निर्दोष नाहीत त्यांना देखील ते वाचवतील, आणि तुझ्या शुद्ध हातांकरवी ते पातक्यांना साहाय्य करतील.” |
|
|
|
|