|
| 1 |
|
| “सर्वसमर्थ आपल्या न्यायाचा समय नेमून का ठेवीत नाही? जे त्यांना ओळखतात त्यांनी त्या दिवसांची व्यर्थ वाट का पाहावी? |
|
| 2 |
|
| असे काही लोक आहेत की जे हद्दीच्या खुणा सरकवितात; चोरी करून आणलेले कळप ते चारतात. |
|
| 3 |
|
| अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात आणि विधवेचा बैल तारण म्हणून ठेवून घेतात. |
|
| 4 |
|
| गरजवंतांना वाटेवरून बाजूला ढकलून देतात देशातील सगळ्या गरिबांना लपून राहण्यास भाग पाडतात. |
|
| 5 |
|
| रानातील रानगाढवां प्रमाणे, गरीब मनुष्य अन्नासाठी कष्ट करीत भटकतात; पडीक जमिनीतून त्यांच्या लेकरांस भोजन पुरवठा होतो. |
|
| 6 |
|
| ते रानातून चारा गोळा करतात आणि दुष्टांच्या द्राक्षमळ्यातून वेचून घेतात. |
|
| 7 |
|
| पुरेशी वस्त्र नसल्याने त्यांना वस्त्रहीनच झोपावे लागते. थंडीत पांघरण्यास देखील त्यांच्याकडे काही नसते. |
|
| 8 |
|
| पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात आणि आश्रय नसल्यामुळे ते खडकांचा आधार घेतात. |
|
| 9 |
|
| पितृहीन बालकांस मातेच्या स्तनापासून ओढून काढले जाते; ऋण फेडून घेण्यासाठी गरिबांची तान्ही बाळे जप्त करतात. |
|
| 10 |
|
| पुरेशी वस्त्र नसल्याने, ते उघडेच असतात; ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशीच राहतात. |
|
| 11 |
|
| आपल्याच आवारात ते जैतुनाचे तेल काढतात; द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवितात, परंतु तहानेने व्याकूळ झालेले असतात. |
|
| 12 |
|
| मरणासन्न असलेल्यांचे कण्हणे शहरातून ऐकू येते, आणि घायाळ झालेल्यांचा मदतीसाठी आक्रोश चालू आहे. तरी देखील परमेश्वर कोणालाही दोष देत नाही. |
|
| 13 |
|
| “काहीजण प्रकाशाविरुद्ध बंड करतात, ज्यांना तो मार्ग अवगत नाही ते त्या मार्गात टिकूनही राहत नाहीत. |
|
| 14 |
|
| दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो, गरीब आणि गरजवंतांना तो ठार करतो, आणि रात्रीच्या वेळी चोरासारखी चोरी करतो. |
|
| 15 |
|
| व्यभिचार्याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो म्हणतो, ‘मला कोणीही पाहत नाही.’ तो आपला चेहरा झाकून घेतो. |
|
| 16 |
|
| चोर अंधारात घरे फोडतात, परंतु दिवसा ते लपून राहतात; त्यांना प्रकाशाशी काहीही देणे घेणे नको असते. |
|
| 17 |
|
| मध्यरात्र त्या प्रत्येकासाठी सकाळ असते, अंधारातील आतंकाशी त्यांचे सख्य असते. |
|
| 18 |
|
| “तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत; त्यांच्या वाट्याची भूमी इतकी शापित असते, की त्यांच्या द्राक्षमळ्यात कोणीही जात नाही. |
|
| 19 |
|
| जसे उष्णता आणि दुष्काळ वितळलेल्या हिमाला शोषून घेते, त्याचप्रमाणे पाप्यांची कबर त्यांना ओढून घेते. |
|
| 20 |
|
| त्यांनी जन्म घेतलेले उदर त्यांना विसरते, किडे त्यांचा फडशा पाडतात; दुष्टांची आठवण देखील पुन्हा केली जात नाही आणि वृक्षाप्रमाणे ते मोडले जातात. |
|
| 21 |
|
| पुत्रहीन व वांझ स्त्रीस ते भक्ष करतात, आणि विधवांशी ते दयेने वागत नाहीत. |
|
| 22 |
|
| परंतु परमेश्वर बलवानाला आपल्या सामर्थ्याने राखतात; त्याला जीवनाची खात्री नसली तरी ते स्थिरावतात. |
|
| 23 |
|
| आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले, तरी परमेश्वराची नजर त्यांच्या मार्गावर असते. |
|
| 24 |
|
| त्यांची बढती केवळ क्षणभंगुर आहे आणि ते लवकरच नष्ट होतात; इतरांप्रमाणे ते देखील गळून पडतात; धान्याच्या कणसाप्रमाणे ते कापले जातील. |
|
| 25 |
|
| “जर असे नाही तर, कोण मला खोटे ठरवेल आणि माझे शब्द कोणाला शून्यात जमा करता येतील?” |
|
|
|
|