|
| 1 |
|
| चांदीसाठी खाण असते आणि सोने शुद्ध करण्याचे एक ठिकाण असते. |
|
| 2 |
|
| लोखंड मातीतून घेतले जाते, आणि दगड वितळून तांबे काढले जाते. |
|
| 3 |
|
| मनुष्य अंधाराची कदर न करता; खूप दूर त्या दाट अंधकारात त्या धातूच्या दगडाचा शोध करीत असतो. |
|
| 4 |
|
| मनुष्यांच्या वसतीपासून दूर, जिथे मानवाच्या पावलांचा कधी स्पर्श झाला नाही, तिथे ते खोल खाण खणतात; व सर्वांपासून दूर घुटमळत व झोके घेत असतात. |
|
| 5 |
|
| पृथ्वी, जी आम्हाला अन्न देते, ती खाली अग्नीने पालटून गेली आहे; |
|
| 6 |
|
| तिच्या खडकातून नीलमणी येतात, आणि त्याच धुळीत सोन्याचे गोळे असतात. |
|
| 7 |
|
| कोणत्याही शिकारी पक्ष्यास तो गुप्त मार्ग माहीत नाही, कोणत्याही बहिरी ससाण्याची नजर त्यावर पडली नाही. |
|
| 8 |
|
| गर्विष्ठ श्वापदाने ना कधी ती आपल्या पायाखाली तुडविली, ना कोणत्याही सिंहाने त्यावर आपला पंजा ठेवला. |
|
| 9 |
|
| गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात आणि पर्वतांना समूळ उघडे करतात. |
|
| 10 |
|
| ते खडकामधून भुयारे तयार करतात; आणि त्यांचे डोळे त्यातील मौल्यवान रत्ने पाहतात. |
|
| 11 |
|
| पाण्याच्या प्रवाहांना ते बांध घालतात आणि गुप्त गोष्टी उजेडात आणतात. |
|
| 12 |
|
| परंतु ज्ञान कुठे सापडेल? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे? |
|
| 13 |
|
| मानवाला त्याचे मोल अवगत नाही; जिवंतांच्या भूमीत ते आढळू शकत नाही. |
|
| 14 |
|
| महासागर म्हणतात, “ते माझ्यात नाही”; आणि समुद्र म्हणतो, “ते माझ्याकडे नाही.” |
|
| 15 |
|
| अतिशुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही, किंवा चांदीच्या मापातही त्याचे मोल करता येत नाही. |
|
| 16 |
|
| ओफीराचे सोने, मोलवान गोमेद किंवा नीलमणी, यांनीही त्याचे मोल करता येणार नाही. |
|
| 17 |
|
| सोने आणि रत्ने किंवा, शुद्ध सोन्याचे अलंकार त्या ज्ञानाच्या तुलनेत बसत नाही. |
|
| 18 |
|
| प्रवाळ व सुर्यकांतमणींचा तर उल्लेखच नको; ज्ञानाचे मोल माणकांपेक्षाही खूपच अधिक आहे. |
|
| 19 |
|
| कूशचा पुष्कराजही त्याची बरोबरी करू शकत नाही, आणि शुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही. |
|
| 20 |
|
| तर मग ज्ञान कुठून येते? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे? |
|
| 21 |
|
| ते प्रत्येक जीवजंतूंच्या नजरेपासून गुप्त ठेवलेले आहे, आकाशातील पक्ष्यांपासून देखील ते लपविलेले आहे. |
|
| 22 |
|
| विनाश आणि मृत्यू म्हणतात, “की आमच्या कानी तर त्याची केवळ वार्ता आली आहे.” |
|
| 23 |
|
| परमेश्वरालाच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग अवगत असतो ते कुठे आढळेल, हे फक्त त्यांनाच माहीत आहे. |
|
| 24 |
|
| कारण परमेश्वर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाहू शकतात. आणि आकाशाखालचे सर्वकाही त्यांना दिसते. |
|
| 25 |
|
| जेव्हा त्यांनी वार्याची गती स्थापित केली आणि जलांचे माप घेतले, |
|
| 26 |
|
| जेव्हा त्यांनी पावसाला नियम, आणि गर्जणार्या विजेला मार्ग आखून दिला, |
|
| 27 |
|
| तेव्हा त्यांनी ज्ञानाकडे पाहून त्याचे मुल्यमापन केले; त्याची पुष्टी करून त्याची पारख केली. |
|
| 28 |
|
| याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले, “प्रभूचे भय—हेच ज्ञान आहे, वाईटापासून दूर राहणे हीच सुज्ञता होय.” |
|
|
|
|