|
| 1 |
|
| यानंतर, इय्योबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. |
|
| 2 |
|
| तो म्हणाला: |
|
| 3 |
|
| “माझा जन्मदिवस नष्ट होवो, आणि ‘पुत्र गर्भधारण झाले!’ असे ज्या रात्रीने म्हटले, |
|
| 4 |
|
| तो दिवस अंधकार असा होवो; वर राहणाऱ्या परमेश्वरासही त्याचे ध्यान न राहो; त्या दिवसावर प्रकाश न पडो. |
|
| 5 |
|
| होय, खिन्नता व संपूर्ण काळोख त्यावर पुन्हा आपला हक्क गाजवो; त्यावर ढग वास्तव्य करून राहो; काळोख त्यावर मात करो. |
|
| 6 |
|
| त्या रात्रीला अंधकार जप्त करो; वर्षाच्या दिवसात त्याची गणती न होवो कोणत्याही महिन्यांमध्ये त्याची गणती न होवो. |
|
| 7 |
|
| ती रात्र उजाड होवो; आणि आनंदाचा गजर त्यातून ऐकू न येवो. |
|
| 8 |
|
| जे दिवसाला शाप देतात, जे लिव्याथानाला चेतविण्यास तयार असतात, ते त्याला शापित करोत. |
|
| 9 |
|
| त्या रात्रीचे तारे अंधकारमय होवोत; दिवसाच्या प्रकाशाची ती व्यर्थ वाट पाहो आणि पहाटेचा पहिला किरण तिच्या दृष्टीस न पडो, |
|
| 10 |
|
| कारण तिने माझ्यावर गर्भाशयद्वार बंद केले नाहीत आणि दुःखाला माझ्या डोळ्याआड केले नाही. |
|
| 11 |
|
| “मी जन्माला आलो तेव्हाच का नाश पावलो नाही? गर्भाशयातून निघताच माझे प्राण का गेले नाहीत? |
|
| 12 |
|
| माझे स्वागत करण्यास मांड्या का तयार होत्या आणि मला दुग्धपान करावे म्हणून स्तन का तयार होते? |
|
| 13 |
|
| कारण मी तर आता शांतपणे पडून निजलेला असतो; मी झोपेत विश्रांती पावलेला असतो. |
|
| 14 |
|
| पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी, ज्यांनी स्वतःसाठी वाडे बांधले ते आता ओसाड पडले आहेत, |
|
| 15 |
|
| ज्या राजपुत्रांच्या जवळ सोने होते, ज्यांनी आपली घरे रुप्यांनी भरली. |
|
| 16 |
|
| अकाली पतन पावलेल्या गर्भासारखे, दिवसाचा प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखे मला जमिनीत गाडून का ठेवले नाही? |
|
| 17 |
|
| कारण तिथे दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात, आणि थकलेले लोक विसावा पावतात. |
|
| 18 |
|
| तिथे बंदिवान देखील स्वस्थ असतात, कारण तिथे गुलामाच्या अधिकार्याचे ओरडणे ऐकू येत नाही. |
|
| 19 |
|
| लहान आणि मोठे तिथे असतात, आणि गुलाम आपल्या धन्यापासून मुक्त झालेले असतात. |
|
| 20 |
|
| “जे कष्टात आहेत त्यांना प्रकाश, आणि जे आत्म्यात कडू आहेत त्यांना जीवन का द्यावे, |
|
| 21 |
|
| ते मृत्यूची उत्कट इच्छा करतात पण ते येत नाही, गुप्त धनापेक्षा अधिक ते मृत्यूला शोधतात, |
|
| 22 |
|
| जेव्हा ते कबरेत पोहोचतात, तेव्हा ते आनंदाने भरतात, आणि उल्हास पावतात. |
|
| 23 |
|
| ज्याचा मार्ग गुपित आहे, ज्याला परमेश्वराने सुरक्षित ठेवले आहे अशा मनुष्याला जीवन का दिले आहे? |
|
| 24 |
|
| उसासे हे माझे रोजचे अन्न झाले आहे; माझे कण्हणे पाण्याप्रमाणे ओतले जात आहे. |
|
| 25 |
|
| ज्याचे मला भय वाटत होते, तेच माझ्यावर चालून आले आहे; जे भयानक तेच माझ्याकडे आले आहे. |
|
| 26 |
|
| मला शांती नाही, स्वस्थता नाही; मला विश्रांती नाही, पण केवळ अस्वस्थता आहे.” |
|
|
|
|