|
| 1 |
|
| “आता हाक मारून पाहा, परंतु तुला कोण उत्तर देणार? पवित्र लोकांपैकी कोणाकडे तू वळशील? |
|
| 2 |
|
| क्रोध मूर्खाचा घात करतो, आणि सामान्य मनुष्याचा मत्सराने घात होतो. |
|
| 3 |
|
| मी मूर्खाला मूळ धरताना पाहिले, परंतु अचानक त्याचे घर शापित झाले. |
|
| 4 |
|
| त्यांची मुलेबाळे सुरक्षित नाहीत, वेशीत ते चिरडली जातात व त्यांना सोडविणारा कोणी नाही. |
|
| 5 |
|
| त्यांच्या कापणीचा हंगाम भुकेले खाऊन टाकतात काट्याकुट्यातून सुद्धा ते काढून नेतात; आणि कारस्थानी त्याच्या धनाचा लोभ धरतात. |
|
| 6 |
|
| कारण कष्ट मातीतून वाढत नाही, आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत. |
|
| 7 |
|
| खरोखर जशा अग्नीच्या ठिणग्या वर उडतात तसा मनुष्यही कष्टासाठी जन्मला आहे. |
|
| 8 |
|
| “मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता. |
|
| 9 |
|
| आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात. |
|
| 10 |
|
| ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात; आणि शेतांवर पाणी पाडतात. |
|
| 11 |
|
| नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात, जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात. |
|
| 12 |
|
| धूर्त लोकांच्या हाताला यश येऊ नये, म्हणून त्यांच्या योजना ते निष्फळ करतात, |
|
| 13 |
|
| ते शहाण्या लोकांस त्यांच्याच धूर्तपणात पकडतात, आणि कुटिलांच्या बेतांचा शेवट करतात. |
|
| 14 |
|
| दिवस असतानाच अंधकार त्यांच्यावर येतो; आणि रात्र असल्याप्रमाणे भर दुपारच्या प्रहरी ते चाचपडतात. |
|
| 15 |
|
| परंतु गरजवंताला त्यांच्या मुखातील तलवारीपासून; व बलवानांच्या तावडीतून वाचवितात. |
|
| 16 |
|
| म्हणून दीन लोकांस आशा आहे, आणि अन्याय आपले तोंड बंद करेल. |
|
| 17 |
|
| “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको. |
|
| 18 |
|
| कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्दा तेच बांधतात; ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो. |
|
| 19 |
|
| सहा संकटातून ते तुला वाचवतील; आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही. |
|
| 20 |
|
| दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील; युद्धकाळात ते तुला तलवारीच्या प्रहारापासून वाचवतील. |
|
| 21 |
|
| जिभेच्या तडाख्यापासून तू सुरक्षित राहशील, विनाश आल्यावर तुला भय बाळगण्याचे नाही. |
|
| 22 |
|
| विनाश व दुष्काळ यांना तू हसशील, आणि हिंस्त्र पशूंचे भय तुला वाटणार नाही. |
|
| 23 |
|
| कारण शेतातील पाषाणांशी तुझा करार होईल, आणि वनपशू तुझ्याशी शांतीने राहतील. |
|
| 24 |
|
| तुझा तंबू सुरक्षित आहे हे तू जाणशील; तपास करशील तेव्हा तुझ्या मालमत्तेतील काहीही गहाळ झालेले तुला आढळणार नाही. |
|
| 25 |
|
| तुला बरीच संतती झाली आहे हे तुला समजेल, आणि तुझे वंशज पृथ्वीवरील गवतासारखे होतील. |
|
| 26 |
|
| जशा हंगामाच्या वेळी धान्याच्या पेंढ्या गोळा करण्यात येतात, तसेच तू कबरेत जाईपर्यंत तुझ्या शौर्याचा ऱ्हास होणार नाही. |
|
| 27 |
|
| “हे सर्व अगदी सत्य आहे आणि याची आम्ही परीक्षा केली आहे. म्हणून माझा हा सल्ला ऐकून त्याचा अंगीकार करून घे.” |
|
|
|
|