|
| 1 |
|
| हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही किती थोर आहात; तुम्ही राजवैभव आणि तेजाने विभूषित आहात. |
|
| 2 |
|
| तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे; अंतराळास एखाद्या तंबूप्रमाणे विस्तीर्ण केले आहे, |
|
| 3 |
|
| आणि आपल्या मजल्यांना जलस्तंभावर बसविले आहे. मेघ त्यांचे रथ आहेत; ते वार्याच्या पंखावर आरूढ होऊन जातात. |
|
| 4 |
|
| ते वायूला आपले दूत; व अग्निज्वालांना आपले सेवक करतात. |
|
| 5 |
|
| तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे, जे कधीही ढळणार नाही. |
|
| 6 |
|
| तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले; जलस्तर पर्वतापेक्षा उंच केले. |
|
| 7 |
|
| परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले, तुमच्या गर्जनेच्या आवाजाने ते भिऊन पळाले; |
|
| 8 |
|
| ते पाणी पर्वतांवरून वाहिले, दर्याखोर्यातून गेले, आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले. |
|
| 9 |
|
| तुम्ही त्यांना मर्यादा ठरवून दिली; जेणेकरून त्यांनी पृथ्वी पुन्हा कधीही व्यापून टाकू नये. |
|
| 10 |
|
| त्यांनी खोर्यांमधून पाण्याचे वाहते झरे केले; पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले. |
|
| 11 |
|
| ते कुरणातील सर्व प्राण्यांना पाणी पुरवितात; त्या ठिकाणी रानगाढवेही आपली तहान भागवितात. |
|
| 12 |
|
| आकाशातील पक्षी त्या प्रवाहाकाठी घरटी बांधून राहतात; व वृक्षांच्या फांद्यांवरून गाणी गातात. |
|
| 13 |
|
| ते त्यांच्या भवनाच्या वरच्या कक्षातून पर्वतावर पाऊस पाडतात; पृथ्वी त्यांच्या फलवंत कार्याने समाधान पावते. |
|
| 14 |
|
| ते जनावरांच्या पोषणाकरिता गवत उत्पन्न करतात, आणि मानवाने मशागत करावी— जमिनीतून अन्न उत्पादन करावे म्हणून: |
|
| 15 |
|
| मानवाचे हृदय उल्हासित करण्यास द्राक्षारस, त्याचे मुख तुळतुळीत राखण्यासाठी तेल आणि त्याच्या हृदयाचे जतन व्हावे म्हणून भाकर उत्पन्न करतात. |
|
| 16 |
|
| याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या गंधसरू वृक्षास भरपूर पाणी पुरवठा असतो. |
|
| 17 |
|
| त्यावर पक्षी आपली घरटी करतात व करकोचा त्याचे घरटे देवदारू वृक्षावर बांधतो. |
|
| 18 |
|
| उंच पर्वत रानबकर्यांचे निवासस्थान आहेत, खडकांमध्ये डोंगरी ससे सुरक्षित बिळे करतात. |
|
| 19 |
|
| त्यांनी ऋतुंची नोंद करण्यासाठी चंद्राची निर्मिती केली, आणि सूर्यास कधी अस्त व्हावे हे ठाऊक आहे. |
|
| 20 |
|
| ते अंधार पाठवितात आणि रात्र होते, तेव्हा वनचर भक्ष्यार्थ बाहेर पडतात. |
|
| 21 |
|
| सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि त्यांचे अन्न परमेश्वराकडून अपेक्षितात. |
|
| 22 |
|
| सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुहांमध्ये परत येऊन लपतात, व शांतपणे झोपतात. |
|
| 23 |
|
| मग लोक त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडतात, व सायंकाळपर्यंत परिश्रम करतात. |
|
| 24 |
|
| हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे: अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे; तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे. |
|
| 25 |
|
| एकीकडे प्रचंड व विस्तृत महासागर पसरलेला आहे; त्यात लहानमोठ्या अशा असंख्य प्राण्यांची रेलचेल आहे. |
|
| 26 |
|
| यात जहाजांचे दळणवळण होत असते, आणि यात क्रीडा करण्यासाठी तुम्ही लिव्याथान निर्माण केला. |
|
| 27 |
|
| निर्धारित वेळेवर अन्न मिळण्यासाठी, प्रत्येक प्राणी आशेने तुमच्याकडे बघतो. |
|
| 28 |
|
| जेव्हा तुम्ही त्यांना पुरविता, तेव्हा ते गोळा करतात; तुम्ही आपला हात पूर्णपणे उघडता आणि तुमच्या विपुल पुरवठ्याने ते तृप्त होतात. |
|
| 29 |
|
| परंतु जेव्हा तुम्ही आपले मुख लपविता, तेव्हा ते व्याकूळ होतात; जेव्हा तुम्ही त्यांचा श्वास काढून घेता, तेव्हा ते मरतात व पुन्हा मातीत जाऊन मिसळतात. |
|
| 30 |
|
| मग तुम्ही आपला आत्मा पाठविता, तेव्हा ते अस्तित्वात येतात, आणि पृथ्वीला पुन्हा नवे स्वरूप आणता. |
|
| 31 |
|
| याहवेहचे वैभव सर्वकाळ राहो; याहवेहला आपल्या कृतीपासून आनंद होवो— |
|
| 32 |
|
| त्यांच्या नेत्रकटाक्षांनी पृथ्वी थरथर कापते; ते स्पर्श करताच पर्वतातून धुराचे लोट बाहेर पडतात. |
|
| 33 |
|
| मी आजीवन याहवेहचे स्तोत्र गाईन; माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या परमेश्वराचे स्तुतिगान करेन. |
|
| 34 |
|
| माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो, कारण याहवेहतच माझा आनंद परिपूर्ण आहे. |
|
| 35 |
|
| सर्व पातकी पृथ्वीवरून नष्ट होवोत; दुष्ट परत न दिसोत. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. याहवेहचे स्तवन कर! |
|
|
|
|