|
| 1 |
|
| ज्यांचे मार्ग निष्कलंक असतात, जे याहवेहच्या नियमानुसार आचरण करतात, ते सर्वजण धन्य होत. |
|
| 2 |
|
| जे मनःपूर्वक त्यांचा शोध घेतात— आणि याहवेहचे अधिनियम पाळतात, ते सर्वजण धन्य होत. |
|
| 3 |
|
| ते अनीती न करता त्यांच्या मार्गाने चालतात. |
|
| 4 |
|
| तुमचे नियम पूर्णपणे पाळले जावेत, म्हणूनच ते तुम्ही योजलेले आहेत. |
|
| 5 |
|
| अहा, तुमचे नियम पाळण्यास माझे आचरण नेहमी स्थिर असते तर किती बरे झाले असते! |
|
| 6 |
|
| मी तुमचे नियम पाळले, तर माझी फजिती होणार नाही. |
|
| 7 |
|
| जेव्हा मी तुमच्या सर्व धार्मिक नियमांचे पालन करेन, तेव्हा सात्विक हृदयाने तुमचे उपकारस्मरण करेन. |
|
| 8 |
|
| मी तुमच्या विधींचे पालन करेन; माझा पूर्णपणे त्याग करू नका. |
|
| 9 |
|
| तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील? ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच. |
|
| 10 |
|
| तुम्हाला शोधण्याचा मी पूर्ण हृदयाने प्रयत्न केला आहे; त्या आज्ञेपासून मला बहकून जाऊ देऊ नका. |
|
| 11 |
|
| मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत, जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये. |
|
| 12 |
|
| हे याहवेह, तुमचे स्तवन होवो; तुमचे विधी मला शिकवा. |
|
| 13 |
|
| तुमच्या मुखातून निघालेले सर्व नियम आपल्या ओठांनी मी त्या सर्वांची पुनरुक्ती करतो. |
|
| 14 |
|
| तुमच्या नियमांचे पालन करण्यात मला असा अत्यानंद होतो, जसा अमाप धनसंपत्ती मिळाल्यावर होतो. |
|
| 15 |
|
| मी तुमच्या नीति-सिद्धांताचे मनन करतो, आणि तुमच्या मार्गाचा आदर करतो. |
|
| 16 |
|
| मी तुमच्या नियमांनी हर्षित होतो; मी तुमच्या वचनांची उपेक्षा करणार नाही. |
|
| 17 |
|
| मी जिवंत असेपर्यंत मला विपुल आशीर्वादित करा, म्हणजे मी तुमच्या वचनाचे पालन करीत राहीन. |
|
| 18 |
|
| तुमच्या नियमशास्त्रातील अद्भुत रम्य गोष्टी पाहण्यासाठी माझे डोळे उघडा. |
|
| 19 |
|
| या पृथ्वीवर मी केवळ एक प्रवासी आहे; तुमच्या आज्ञा माझ्यापासून लपवून ठेऊ नका. |
|
| 20 |
|
| तुमच्या नियमांची सतत लागलेली उत्कंठा मला कासावीस करते. |
|
| 21 |
|
| तुमच्या आज्ञांपासून पथभ्रष्ट झालेल्या शापित आणि गर्विष्ठ लोकांना तुम्ही धमकाविता. |
|
| 22 |
|
| त्यांनी केलेला उपहास व तिरस्कारास माझ्यापासून दूर करा, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो. |
|
| 23 |
|
| अधिपती जरी एकत्र बसतात व माझ्याविरुद्ध बोलतात, तरी तुमचा सेवक तुमच्या विधींचे मनन करेल. |
|
| 24 |
|
| तुमचे नियम मला आनंददायी वाटतात; तेच माझे सल्लागार आहेत. |
|
| 25 |
|
| मी पूर्णपणे निरुत्साही होऊन धुळीत पडून आहे; तुम्ही आपल्या वचनानुसार माझ्या जीवनाचे जतन करा. |
|
| 26 |
|
| मी माझ्या मार्गाचे वर्णन केले आणि तुम्ही मला उत्तर दिले; तुमचे नियम मला शिकवा. |
|
| 27 |
|
| तुमच्या शिक्षणाची पद्धत मला समजू द्या, म्हणजे मी तुमच्या अद्भुत कृत्यांचे मनन करेन. |
|
| 28 |
|
| दुःखाने मी हतबल झालो आहे; तुमच्या वचनांद्वारे मला सशक्त करा. |
|
| 29 |
|
| असत्य मार्गापासून मला दूर ठेवा; तुमच्या कृपेनुसार आपल्या विधिनियमांचे मला शिक्षण द्या. |
|
| 30 |
|
| विश्वसनीय मार्गाची मी निवड केली आहे; तुमच्या नियमांवर मी आपले हृदय केंद्रित केले आहे. |
|
| 31 |
|
| याहवेह, मी तुमच्या आज्ञांना चिकटून राहतो, मला लज्जित होऊ देऊ नका. |
|
| 32 |
|
| मी तुम्ही आज्ञापिलेल्या मार्गावर धावत आहे, कारण तुम्ही माझी समज विस्तृत केली आहे. |
|
| 33 |
|
| हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या, जेणेकरून शेवटपर्यंत मी त्याचे पालन करावे. |
|
| 34 |
|
| मला सुबुद्धी द्या, म्हणजे मी तुमचे नियम समजून त्यांचे पूर्ण हृदयाने पालन करत राहीन. |
|
| 35 |
|
| तुमच्या मार्गावर चालण्यास माझे मार्गदर्शन करा, कारण तेच मला आनंद देतात. |
|
| 36 |
|
| मी तुमच्या आज्ञापालनाची आवड धरावी, परंतु स्वार्थाच्या लाभाची नव्हे. |
|
| 37 |
|
| निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी फिरवा; तुमच्या मार्गानुसार माझ्या जीवनाचे जतन करा. |
|
| 38 |
|
| तुमच्या सेवकाला दिलेली अभिवचने पूर्ण करा, म्हणजे तुमचे भय कायम राहील. |
|
| 39 |
|
| लज्जेची भीती माझ्यापासून दूर करा, कारण तुमच्या आज्ञा उत्तम आहेत. |
|
| 40 |
|
| तुमच्या आज्ञापालनास मी किती उत्कंठित आहे! तुमच्या नीतिमत्तेनुसार माझ्या जीवनाचे जतन करा. |
|
| 41 |
|
| हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो; |
|
| 42 |
|
| मग मला टोचून बोलणार्यांना मी उत्तर देईन, कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो. |
|
| 43 |
|
| तुमचे सत्यवचन माझ्या मुखातून कधीही काढून घेऊ नका, कारण तुमच्या अधिनियमावर मी आशा ठेवली आहे. |
|
| 44 |
|
| मी सदासर्वकाळ, तुमच्या नियमांचे सतत पालन करेन. |
|
| 45 |
|
| मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो, कारण मी तुमचे नियम आत्मसात केले आहेत. |
|
| 46 |
|
| तुमचे नियम मी राजांसमोर विदित करेन आणि मी लज्जित केला जाणार नाही. |
|
| 47 |
|
| तुमच्या नियमात माझा आनंद आहे, कारण ते मला प्रिय आहेत. |
|
| 48 |
|
| मला प्रिय असलेल्या तुमच्या आज्ञांकडे मी माझे हात पुढे करेन, जेणेकरून मी तुमच्या नियमांचे मनन करू शकेन. |
|
| 49 |
|
| तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा, कारण तुम्हीच मला आशा दिली आहे; |
|
| 50 |
|
| माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते. |
|
| 51 |
|
| गर्विष्ठ लोक निर्दयपणे माझा उपहास करतात, तरी मी तुमच्या नियमशास्त्रापासून ढळत नाही. |
|
| 52 |
|
| याहवेह, तुमच्या प्राचीन आज्ञांचे मी स्मरण करतो, व त्यापासून माझे सांत्वन होते. |
|
| 53 |
|
| संताप मला व्यापून टाकतो, कारण त्या दुष्टांनी तुमच्या आज्ञा धिक्कारल्या आहेत. |
|
| 54 |
|
| मी कुठेही राहिलो तरी, तुमचे नियम माझ्या गीतांचे विषय झाले आहेत. |
|
| 55 |
|
| हे याहवेह, मी रात्रीही तुमचे नामस्मरण करतो, जेणेकरून तुमच्या आज्ञा मी सतत पाळीन. |
|
| 56 |
|
| तुमच्या आज्ञांचे पालन करणे: माझा परिपाठ झाला आहे. |
|
| 57 |
|
| याहवेह, तुम्ही माझा वाटा आहात; तुमचे नियम पालन करण्याचे मी वचन दिले आहे. |
|
| 58 |
|
| पूर्ण हृदयाने मी तुमचे मुख पाहण्याचा प्रयास करतो; आपल्या अभिवचनाप्रमाणे तुम्ही माझ्यावर कृपा करा. |
|
| 59 |
|
| माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला, आणि तुमच्या नियमाचे पालन करण्याकडे माझी पावले वळविली आहेत. |
|
| 60 |
|
| मी त्वरा करेन, आणि तुमच्या आदेशांचे अविलंब पालन करेन. |
|
| 61 |
|
| दुष्टांनी मला दोरखंडाने बांधले तरीही, मी तुमचे नियम विसरणार नाही. |
|
| 62 |
|
| मी मध्यरात्रीही उठून तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल तुमची उपकारस्तुती करेन. |
|
| 63 |
|
| माझी मैत्री त्या सर्वांशी आहे, जे तुमचे भय धरतात व तुमचे आज्ञापालन करतात. |
|
| 64 |
|
| हे याहवेह, तुमच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तुमचे नियम मला शिकवा. |
|
| 65 |
|
| हे याहवेह, तुम्ही वचन दिल्याप्रमाणे, तुमच्या सेवकाचे कल्याण करा. |
|
| 66 |
|
| तुम्ही मला ज्ञान व विवेक शिकवा, कारण तुमच्या आज्ञांवर माझा पूर्ण विश्वास आहे. |
|
| 67 |
|
| पीडित होण्याआधी मी पथभ्रष्ट झालो होतो, पण आता तुमचे वचन मी पाळतो. |
|
| 68 |
|
| तुम्ही चांगले आहात आणि जे तुम्ही करता तेही भलेच असते; मला तुमचे विधिशिक्षण द्या. |
|
| 69 |
|
| गर्विष्ठ लोकांनी माझ्याविरुद्ध कुभांडे रचली आहेत, परंतु तुमचे नियम मी संपूर्ण अंतःकरणाने पाळतो. |
|
| 70 |
|
| त्यांची अंतःकरणे कठोर व संवेदनाहीन झाली आहेत, परंतु तुमच्या नियमशास्त्राने मी सुखावतो. |
|
| 71 |
|
| मला मिळालेली पीडा माझ्या हिताची होती, जेणेकरून मी तुमचे नियम शिकावे; |
|
| 72 |
|
| तुमच्या मुखातून निघालेले नियम, चांदी आणि सोने यांच्या हजारो नाण्यांपेक्षाही अधिक मोलाचे आहेत. |
|
| 73 |
|
| तुमच्या हातांनी मला घडविले आणि आकार दिला; आता तुमचे नियम समजण्यास मला सुबुद्धी द्या. |
|
| 74 |
|
| जे तुमचे भय धरतात ते सर्वजण मला बघून उल्हासित होवोत, कारण मी तुमच्या वचनावर आशा ठेवली आहे. |
|
| 75 |
|
| हे याहवेह, तुमचे निर्णय अगदी न्याय्य आहेत, हे मला माहीत आहे; सत्यतेने तुम्ही मला शिक्षा दिली; |
|
| 76 |
|
| तुमच्या अभिवचनानुसार तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो; |
|
| 77 |
|
| मी जगावे म्हणून तुमची दया मला प्राप्त होवो कारण तुमचे नियम माझा आनंद आहेत. |
|
| 78 |
|
| गर्विष्ठ लोकांची अप्रतिष्ठा होवो, विनाकारण त्यांनी मजवर अन्याय केला आहे, परंतु मी तुमच्या नियमांचे मनन करेन. |
|
| 79 |
|
| तुमचे भय धरणारे व तुमचे नियम समजणारे, ते सर्वजण माझ्याकडे वळोत. |
|
| 80 |
|
| मी निर्दोष अंतःकरणाने तुमच्या विधींचे पालन करेन, म्हणजे मी कधीच लज्जित होणार नाही. |
|
| 81 |
|
| तुम्ही केलेल्या तारणप्राप्तीसाठी माझा जीव उत्कंठित झाला आहे, पण तुमच्या वचनावर मी आशा ठेवतो. |
|
| 82 |
|
| तुमच्या अभिवचनपूर्तीची वाट पाहून माझे डोळे शिणले आहेत; मी म्हणतो, “तुम्ही माझे सांत्वन केव्हा करणार?” |
|
| 83 |
|
| जरी मी धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा झालो आहे; तरी मी तुमचे नियम कधीही विसरत नाही. |
|
| 84 |
|
| तुमच्या सेवकाने किती काळ वाट पाहावी? माझा छळ करणार्यांना तुम्ही कधी शिक्षा कराल? |
|
| 85 |
|
| अहंकारी मला अडकविण्यासाठी खड्डे खणत आहेत, जे तुमच्या नियमाविरुद्ध आहे. |
|
| 86 |
|
| तुमच्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; तुम्ही मला साहाय्य करा, विनाकारण माझा छळ होत आहे. |
|
| 87 |
|
| त्यांनी पृथ्वीवरून मला जवळपास नामशेषच केले होते; तरी तुमचे नियम मी नाकारले नाही. |
|
| 88 |
|
| तुमच्या अक्षय प्रीतीस अनुसरून माझ्या जिवाचे रक्षण करा, म्हणजे तुमच्या मुखातून निघालेले नियम मला पाळता येतील. |
|
| 89 |
|
| हे याहवेह, तुमचे वचन अनंतकाळचे आहे; ते स्वर्गात सर्वकाळ स्थिर राहते. |
|
| 90 |
|
| तुमची विश्वसनीयता पिढ्यान् पिढ्या टिकून राहते; तुम्ही पृथ्वीची स्थापना केली आणि ती आजतागायत स्थिर आहे. |
|
| 91 |
|
| तुमचे नियम आजवर अस्तित्वात आहेत, कारण सर्वकाही तुमची सेवा करतात. |
|
| 92 |
|
| जर तुमचे नियम माझ्या सुखाचा ठेवा झाले नसते, तर पीडेने माझा केव्हाच अंत झाला असता. |
|
| 93 |
|
| मी तुमचे नियम कधीही विसरणार नाही, कारण त्यांच्याद्वारे तुम्ही माझ्या जीवनाचे जतन केले आहे. |
|
| 94 |
|
| मी तुमचा आहे, माझे तारण करा; कारण मी तुमच्या विधीचा शोधक आहे. |
|
| 95 |
|
| दुष्ट लोक माझा नाश करण्याची वाट पाहत आहेत, तरी मी माझे चित्त तुमच्या अधिनियमाकडे लावेन. |
|
| 96 |
|
| प्रत्येक परिपूर्णतेला सीमा असते, परंतु तुमच्या आज्ञा निस्सीम आहेत. |
|
| 97 |
|
| अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो! मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो. |
|
| 98 |
|
| तुमची वचने सतत माझ्यासह असतात, आणि ती माझ्या शत्रूंपेक्षा मला अधिक ज्ञानी करतात. |
|
| 99 |
|
| मला माझ्या सर्व शिक्षकांहून अधिक शहाणपण आहे, कारण तुमच्या नियमांचे मी सतत मनन करतो. |
|
| 100 |
|
| मी माझ्या वडीलजनांपेक्षाही अधिक सुज्ञ आहे, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो. |
|
| 101 |
|
| दुष्टाईच्या मार्गावर मी माझी पावले टाकीत नाही, जेणेकरून मी तुमच्या आज्ञांचे पालन करू शकेन. |
|
| 102 |
|
| मी तुमच्या वचनाकडे पाठ फिरवीत नाही; कारण तुम्ही स्वतः मला शिक्षण दिले आहे. |
|
| 103 |
|
| किती मधुर आहेत तुमची वचने, माझ्या मुखात ती मला मधापेक्षाही गोड लागतात! |
|
| 104 |
|
| तुमच्या नियमांद्वारेच मला सुज्ञता प्राप्त होते; म्हणून मी प्रत्येक खोट्या मार्गाचा तिरस्कार करतो. |
|
| 105 |
|
| तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे. |
|
| 106 |
|
| मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे, की मी तुमच्या नीतियुक्त नियमांचे पालन करेन. |
|
| 107 |
|
| याहवेह, माझी पीडा असह्य झाली आहे; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझे जतन करा. |
|
| 108 |
|
| याहवेह, माझ्या मुखातून निघालेल्या स्वैच्छिक स्तवनाचा स्वीकार करा, आणि तुमचे नियम मला शिकवा. |
|
| 109 |
|
| जरी मी माझे जीवन सतत स्वतःच्या हातात घेतो, तरी मी तुमचे नियम विसरणार नाही. |
|
| 110 |
|
| दुष्ट लोकांनी माझ्यासाठी सापळे लावलेले आहेत, तरीपण मी तुमच्या मार्गावरून ढळणार नाही. |
|
| 111 |
|
| तुमचे नियम माझा सर्वकाळचा वारसा आहेत, माझ्या अंतःकरणाचा उल्हास आहेत. |
|
| 112 |
|
| शेवटपर्यंत पूर्ण हृदयाने तुमचे आज्ञापालन करण्याचे मी निश्चित केले आहे. |
|
| 113 |
|
| दुटप्पी लोकांचा मला तिरस्कार वाटतो, पण मला तुमचे नियम प्रिय आहेत. |
|
| 114 |
|
| तुम्ही माझा आश्रय व माझी ढाल आहात; तुमच्या अभिवचनांवर मी आशा ठेवली आहे. |
|
| 115 |
|
| अहो कुकर्मी लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा, जेणेकरून माझ्या परमेश्वराच्या आज्ञांचे मी पालन करेन. |
|
| 116 |
|
| हे परमेश्वरा, तुमच्या अभिवचनानुसार माझे जतन करा, म्हणजे मी जिवंत राहीन; माझी आशाभंग होऊ देऊ नका. |
|
| 117 |
|
| मला उचलून धरा म्हणजे माझी सुटका होईल; मी तुमच्या नियमांचा नेहमी आदर करतो. |
|
| 118 |
|
| जे तुमच्या नियमापासून पथभ्रष्ट होतात, त्यांना तुम्ही नाकारले आहे, त्यांचा संभ्रम निरर्थक ठरू द्या. |
|
| 119 |
|
| पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तुम्ही एखाद्या गाळाप्रमाणे टाकून देता; म्हणूनच तुमचे नियम मला प्रिय आहेत. |
|
| 120 |
|
| तुमच्या भीतीने माझा देह थरथर कापतो; मला तुमच्या विधिनियमाचा दरारा वाटतो. |
|
| 121 |
|
| मी धर्माचरणाने व न्यायीपणाने वागलो आहे; माझा छळ करणार्यांच्या हाती मला सोपवू नका. |
|
| 122 |
|
| आपल्या सेवकाचे कल्याण सुनिश्चित करा; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नका. |
|
| 123 |
|
| माझ्या तारणाचे तुमचे नीतियुक्त अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहता माझे डोळे अंधुक झाले आहेत. |
|
| 124 |
|
| आपल्या प्रेमदयेस अनुसरून तुमच्या सेवकाशी व्यवहार करा आणि मला तुमचे नियम शिकवा. |
|
| 125 |
|
| मी तुमचा दास आहे; मला विवेकबुद्धी द्या, म्हणजे तुमचे नियम समजतील. |
|
| 126 |
|
| हे याहवेह, तुम्ही कृती करण्याची वेळ आली आहे; तुमच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. |
|
| 127 |
|
| कारण मी तुमच्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावन्नकशी सोन्यापेक्षाही अधिक प्रिय मानतो, |
|
| 128 |
|
| कारण तुमचा प्रत्येक नियम यथायोग्य मानतो; म्हणून सर्व असत्य मार्गाचा मी द्वेष करतो. |
|
| 129 |
|
| तुमचे नियम अद्भुत आहेत; म्हणून मी त्यांचे पालन करतो. |
|
| 130 |
|
| तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो; ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते. |
|
| 131 |
|
| माझे मुख उघडून मी धापा टाकल्या, कारण तुमच्या आदेशाची मला आस लागली होती. |
|
| 132 |
|
| मजकडे वळा आणि माझ्यावर दया करा, जशी तुमच्या नामावर प्रीती करणार्यांवर तुम्ही नेहमी करता, तशी करा. |
|
| 133 |
|
| तुमच्या वचनानुसार माझ्या पावलांचे मार्गदर्शन करा, म्हणजे पाप मजवर सत्ता गाजविणार नाही. |
|
| 134 |
|
| मनुष्याच्या अत्याचारापासून मला सोडवा, म्हणजे मला तुमच्या आज्ञा पाळता येतील. |
|
| 135 |
|
| तुमच्या सेवकावर आपला मुखप्रकाश पडू द्या, आणि तुमचे सर्व नियम मला शिकवा. |
|
| 136 |
|
| माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात, कारण तुमच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. |
|
| 137 |
|
| हे याहवेह, तुम्ही न्यायी आहात, आणि तुमचे नियमही अचूक आहेत. |
|
| 138 |
|
| तुम्ही योजलेले अधिनियम अत्यंत नीतियुक्त आहेत; ते पूर्णपणे विश्वसनीय होत. |
|
| 139 |
|
| माझा आवेश मला पार झिजवित आहे, कारण माझे शत्रू तुमचे नियम उपेक्षितात. |
|
| 140 |
|
| तुमची अभिवचने पूर्णपणे पारखली गेली आहेत, म्हणूनच तुमच्या सेवकाला ती अतिशय प्रिय आहेत. |
|
| 141 |
|
| मी स्वतः महत्त्वहीन व तिरस्कृत असलो, तरी तुमचे नियम मी विसरत नाही. |
|
| 142 |
|
| तुमची धार्मिकता सार्वकालिक आहे, आणि तुमचे नियम सत्य आहेत. |
|
| 143 |
|
| संकट आणि क्लेशाने मला घेरले आहे, परंतु तुमच्या आज्ञा मला सुखावतात. |
|
| 144 |
|
| तुमचे नियम सर्वदा न्याय्य असतात; ते समजण्यास मला साहाय्य करा म्हणजे मी जगेन. |
|
| 145 |
|
| हे याहवेह, मी मनापासून धावा करीत आहे; मला उत्तर द्या, म्हणजे मी तुमच्या नियमांचे पालन करेन. |
|
| 146 |
|
| मी आरोळी मारून म्हणतो, माझे रक्षण करा म्हणजे मी तुमच्या आज्ञा पाळू शकेन. |
|
| 147 |
|
| सूर्योदयापूर्वी मी उठून मदतीसाठी तुमचा धावा करतो; माझी संपूर्ण आशा तुमच्या वचनावर आहे. |
|
| 148 |
|
| मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो, म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन. |
|
| 149 |
|
| तुमच्या वात्सल्य-कृपेनुसार माझी प्रार्थना ऐका; याहवेह, तुमच्या वचनानुरुप माझे जतन करा. |
|
| 150 |
|
| माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे निकट आले आहेत, पण ते तुमच्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. |
|
| 151 |
|
| परंतु हे याहवेह, तुम्ही माझ्याजवळ आहात, व तुमच्या सर्व आज्ञा सत्य आहेत. |
|
| 152 |
|
| अनेक वर्षापूर्वी तुमच्या अधिनियमांबद्दल मी हे शिकलो आहे की, ते तुम्ही सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. |
|
| 153 |
|
| माझ्या दुःखाकडे पाहा आणि मला त्यातून सोडवा, कारण मी तुमच्या आज्ञा विसरलो नाही. |
|
| 154 |
|
| माझ्या वादाचे समर्थन करा आणि माझी सुटका करा; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या जीवनाचे जतन करा. |
|
| 155 |
|
| दुष्ट लोक तारणप्राप्तीपासून फार दूर आहेत, कारण ते तुमच्या नियमांचा मुळीच शोध करीत नाहीत. |
|
| 156 |
|
| हे याहवेह, तुमची दया किती महान आहे; तुमच्या नियमानुसार माझे जतन करा. |
|
| 157 |
|
| मला छळणारे कितीतरी शत्रू आहेत, पण मी तुमचा आज्ञाभंग केला नाही. |
|
| 158 |
|
| मला या विश्वासघातक्यांचा वीट आला आहे, कारण ते तुमच्या वचनाचे पालन करीत नाहीत. |
|
| 159 |
|
| याहवेह पाहा, मी तुमच्या आज्ञांवर किती मनापासून प्रीती करतो; तुमच्या वात्सल्यानुरूप माझी जोपासना करा. |
|
| 160 |
|
| तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत; तुमचे सर्व नीतियुक्त न्याय अनंतकाळचे आहेत. |
|
| 161 |
|
| अधिपतींनी कारण नसताना माझा छळ केला, परंतु माझे हृदय केवळ तुमच्याच वचनांनी कंपित होते. |
|
| 162 |
|
| मोठा धनसंचय सापडलेल्या मनुष्याला होतो, तसा मला तुमच्या अभिवचनांनी आनंद होतो. |
|
| 163 |
|
| असत्याचा मी द्वेष व घृणा करतो, पण तुमच्या नियमांवर मी प्रीती करतो. |
|
| 164 |
|
| तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल दिवसातून सात वेळा मी तुमचे स्तवन करतो. |
|
| 165 |
|
| जे तुमच्या नियमांवर प्रीती करतात, त्यांना मोठी शांती लाभते, आणि ते कधीही विचलित होत नाहीत. |
|
| 166 |
|
| याहवेह, तुमच्या तारणाची मी प्रतीक्षा करतो, आणि मी तुमच्या आज्ञा पाळतो. |
|
| 167 |
|
| मी तुमच्या आज्ञांचे पालन करतो, कारण त्या मला अतिशय प्रिय आहेत. |
|
| 168 |
|
| मी तुमचे उपदेश व नियम पाळतो, कारण माझा प्रत्येक मार्ग तुम्हाला माहीत आहे. |
|
| 169 |
|
| हे याहवेह, माझी हाक तुम्हापर्यंत पोहचो; आपल्या वचनाप्रमाणे मला विवेकवंत करा. |
|
| 170 |
|
| माझी प्रार्थना तुम्हापर्यंत पोहचो; तुम्ही आपल्या अभिवचनाप्रमाणे माझी सुटका करा. |
|
| 171 |
|
| माझे ओठ भरभरून तुमचे स्तवन करो, कारण तुम्ही मला तुमचे विधी शिकविले आहेत. |
|
| 172 |
|
| माझी जीभ तुमच्या वचनांची स्तुतिगीते गाओ, कारण तुमचे सर्व नियम नीतियुक्त आहेत. |
|
| 173 |
|
| मला साहाय्य करण्यास तुमची भुजा सतत तयार राहो, कारण मी तुमच्या अधिनियमांचा स्वीकार केला आहे. |
|
| 174 |
|
| हे याहवेह, मी तुमच्या तारणाची उत्कंठा धरलेली आहे; तुमचे नियम माझा अत्यानंद देतात. |
|
| 175 |
|
| मला आयुष्यमान करा, जेणेकरून मी तुझी स्तुती करेन, आणि तुमचे नियम माझी जोपासना करोत. |
|
| 176 |
|
| हरवलेल्या मेंढराप्रमाणे मी बहकलो, माझा शोध घ्या, कारण तुमच्या आज्ञा मी विसरलो नाही. |
|
|
|
|