×

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती

स्तोत्र १४२

1
मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो; मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो.
2
माझी तक्रार मी त्यांच्यापुढे ओतत आहे, आणि माझे कष्ट मी त्यांच्यासमोर प्रकट करत आहे.
3
कारण माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे, तुमच्यासमोर माझी नियती नेहमी स्पष्ट असते. माझ्या शत्रूंनी माझ्या मार्गात सापळे लावले आहेत.
4
ते पाहा! माझ्या उजवीकडे मला साहाय्य करणारा कोणीही नाही; माझी कोणालाही पर्वा नाही. मला काहीच आश्रय नाही; माझ्या जिवाची कोणासही चिंता नाही.
5
मी याहवेहचा धावा करतो; मी म्हटले, “तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात, जिवंतांच्या भूमीत तुम्हीच माझे विधिलिखित आहात.”
6
माझा धावा ऐका, कारण मी अत्यंत निराशाजनक मनःस्थितीत आहे; माझा छळ करणार्‍यांपासून तुम्ही मला मुक्त करा, कारण ते माझ्यापेक्षा अत्यंत बलिष्ठ आहेत.
7
मला बंदिवासातून मुक्त करा, म्हणजे मला तुमची उपकारस्तुती करता येईल; मग तुम्ही मला साहाय्य केले, म्हणून नीतिमान लोक माझ्याबरोबर आनंदोत्सव करतील.
Marathi Bible MRCV 2024
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™ ग्रंथाची मालकी 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc. यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव
:
टिपा जतन करा