पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. |
| 2 |
| माझा निवाडा तुझ्यापुढे होवो; तुझे डोळे समदृष्टीने पाहोत. |
| 3 |
| तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस, तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही; मी मुखाने अतिक्रमण करणार नाही, असा संकल्प मी केला आहे. |
| 4 |
| माणसांच्या कृत्यांविषयी म्हटले, तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी स्वतःला जबरदस्त माणसांच्या मार्गांपासून दूर ठेवले आहे. |
| 5 |
| माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत. |
| 6 |
| मी तुझा धावा केला आहे, कारण, हे देवा, तू माझे ऐकतोस; माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. |
| 7 |
| तुझा आश्रय करणार्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. |
| 8 |
| मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव, |
| 9 |
| कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात. |
| 10 |
| त्यांना चरबी चढली आहे; ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करतात. |
| 11 |
| आता ते पावलोपावली आम्हांला घेरत आहेत; ते आम्हांला धुळीस मिळवू पाहत आहेत. |
| 12 |
| भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा, तो आहे. |
| 13 |
| हे परमेश्वरा, ऊठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर; आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव. |
| 14 |
| हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून, आपल्या हाताने माझा जीव सोडव; ते आपल्या संततीतच तृप्त असोत, आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत; |
| 15 |
| मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/017.mp3
150
17