पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| जे दुर्बलांची चिंता करतात, ते धन्य; याहवेह त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांना मुक्त करतील. |
| 2 |
| याहवेह त्यांचे रक्षण करून त्यांना सांभाळतील— ते आपल्या राष्ट्रात आशीर्वादित होतील— ते त्यांना शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाहीत. |
| 3 |
| ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात; ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात. |
| 4 |
| मी म्हणालो, “याहवेह, माझ्यावर दया करा; मला रोगमुक्त करा, कारण मी तुमच्याविरुद्ध पातके केली आहेत.” |
| 5 |
| माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात, “तो केव्हा मरणार आणि त्याचे नाव विसरले जाणार?” |
| 6 |
| जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो, तेव्हा तो पोकळपणा दर्शवितो, तो अंतःकरणात वाईटाचा संग्रह करतो; तो बाहेर जाऊन या गोष्टीचा प्रचार करतो. |
| 7 |
| माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात; माझ्याबाबतीत वाईट बेत आखतात. |
| 8 |
| “त्याला असाध्य रोग झालेला आहे; तो आता या रोगशय्येवरून पुन्हा उठणार नाही,” असे ते म्हणतात. |
| 9 |
| प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे. |
| 10 |
| परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा; म्हणजे मला त्यांचा सूड घेता येईल. |
| 11 |
| तुम्ही माझ्याविषयी संतुष्ट आहात, म्हणून माझे शत्रू माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही. |
| 12 |
| तुम्ही मला माझ्या प्रामाणिकपणामुळे स्थिर ठेवा आणि सदैव तुमच्या समक्षतेत ठेवा. |
| 13 |
| इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून अनंत काळापर्यंत आहेत त्यांची स्तुती असो. आमेन आणि आमेन. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/041.mp3
150
41