पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| यहूदाच्या रानात असताना रचलेले दाविदाचे स्तोत्र. हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. |
| 2 |
| अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. |
| 3 |
| तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करतील. |
| 4 |
| मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन; तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन. |
| 5 |
| मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल; आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील. |
| 6 |
| मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो, व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो. |
| 7 |
| कारण तू माझे साहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन. |
| 8 |
| माझ्या जिवाने तुझी कास धरली आहे; तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो; |
| 9 |
| पण जे माझ्या जिवाचा घात करण्यास टपले आहेत, ते पृथ्वीच्या अधोभागी जातील. |
| 10 |
| तलवारीने त्यांचा निःपात होईल; ते कोल्ह्यांचे खाद्य होतील. |
| 11 |
| राजा देवाच्या ठायी हर्ष पावेल; जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करील; कारण असत्य बोलणार्यांचे तोंड बंद होईल. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/063.mp3
150
63