|
| 1 |
|
| याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो; जे माझ्या पाठीस लागले आहेत, त्या सर्वांपासून माझे रक्षण करा आणि मला सोडवा. |
|
| 2 |
|
| नाहीतर, सिंहाप्रमाणे ते मला फाडून टाकतील; मला सोडविण्यास कोणीही नाही म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील. |
|
| 3 |
|
| याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल, माझे हात सदोष असतील, |
|
| 4 |
|
| जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल, माझ्या शत्रूला विनाकारण लुबाडले असेल— |
|
| 5 |
|
| तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत; माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो. |
|
| 6 |
|
| हे याहवेह, आपल्या रागाने उठा; माझ्या शत्रूंच्या क्रोधाविरुद्ध उभे राहा; जागे व्हा आणि न्याय्य निर्णय द्या. |
|
| 7 |
|
| उच्चस्थानी सिंहासनावर आरूढ असता, सर्व राष्ट्रांनी तुमच्याभोवती एकत्र जमावे. |
|
| 8 |
|
| याहवेहच, सर्व मानवजातीचा न्याय करोत. माझ्या प्रामाणिकपणानुसार तुम्ही माझे समर्थन करा. हे सर्वोच्च परमेश्वरा! माझ्या धार्मिकतेनुसार माझा न्याय करा. |
|
| 9 |
|
| दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा नीतिमानाला स्थिर करा— तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात. |
|
| 10 |
|
| सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात. |
|
| 11 |
|
| परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत, जे दुष्टाईचा सदैव तिरस्कार करतात. |
|
| 12 |
|
| दुष्टांनी आपले मार्ग बदलले नाहीत, तर परमेश्वर आपली तलवार पाजळतील; आपले धनुष्य वाकवून त्याची दोरी ताणली आहे. मन |
|
| 13 |
|
| त्यांनी आपली घातक शस्त्रे सज्ज केली आहेत; आपले अग्निबाण तयार ठेवले आहेत. |
|
| 14 |
|
| जे दुष्टपणाचा वेणा देतात, ते उपद्रवाचे गर्भधारण करतात आणि फसवणुकीला जन्म देतात. |
|
| 15 |
|
| जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात ते स्वतःच त्यांनी खणलेल्या खड्ड्यात पडतात. |
|
| 16 |
|
| त्यांच्या दुष्टाईने त्यांनाच शासन होते; त्यांची हिंसा त्यांच्याच डोक्यावर येऊन बसते. |
|
| 17 |
|
| याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन. परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन. |
|
|
|
|