|
| 1 |
|
| इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका, तुम्हीच योसेफाला मेंढरांच्या कळपाप्रमाणे चालविले. करुबांच्या मध्ये विराजमान असलेले, तुमचे तेजस्वी गौरव प्रगट करा. |
|
| 2 |
|
| एफ्राईम, बिन्यामीन व मनश्शेहच्या समोर आपली प्रतापी शक्ती जागृत होऊ द्या; या व आमचे तारण करा. |
|
| 3 |
|
| हे परमेश्वरा, आम्हाला पूर्वस्थितीत आणा; आमचे तारण होण्यासाठी, तुमचे मुख आमच्यावर प्रकाशित करा. |
|
| 4 |
|
| हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुमच्या प्रजेच्या प्रार्थनांविरुद्ध, कुठवर तुमचा क्रोध भडकत राहणार? |
|
| 5 |
|
| तुम्ही त्यांना दुःखाच्या भाकरीचा आहार खाऊ घातला; वाट्या भरून अश्रूंचे पेय त्यांना पाजले. |
|
| 6 |
|
| तुम्ही आम्हाला शेजार्यांच्या निंदेचा विषय केले आहे; ते आपसात आमचा उपहास करतात. |
|
| 7 |
|
| हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमची पुनर्स्थापना करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, म्हणजे आमचे तारण होईल. |
|
| 8 |
|
| तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली; इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले. |
|
| 9 |
|
| तुम्ही जमिनीची मशागत केली व ती नांगरली; या वेलीने मूळ धरले व समस्त भूमी व्यापून टाकली. |
|
| 10 |
|
| मजबूत गंधसरू व तिच्या फांद्यांच्या सावलीने पर्वतदेखील झाकले गेले; |
|
| 11 |
|
| त्या फांद्या समुद्रापर्यंत, तसेच फरात नदीपर्यंत पसरत गेल्या. |
|
| 12 |
|
| तुम्ही त्याचे तट का मोडून टाकले, म्हणजे येणारे जाणारे सर्वजण त्याचे द्राक्ष तोडतील? |
|
| 13 |
|
| रानडुकरे त्याला गिळंकृत करत आहेत, आणि भूमीतील कीटकांचा ते आहार झाले आहेत. |
|
| 14 |
|
| हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्याकडे परत या! स्वर्गातून खाली दृष्टी लावा! या द्राक्षवेलीची काळजी घ्या. |
|
| 15 |
|
| तुम्ही स्वतःच उजव्या हाताने लावलेल्या, स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या. |
|
| 16 |
|
| कारण तुमच्या द्राक्षवेलीला छाटले गेले आहे व अग्नीत भस्म केले जात आहे; तुमच्या फटकारण्याने लोक नष्ट होतात. |
|
| 17 |
|
| जो मनुष्य तुमच्या उजव्या बाजूला आहे त्याच्यावर तुमचा वरदहस्त असू द्या, स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या. |
|
| 18 |
|
| मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही; आम्हाला संजीवित करा, म्हणजे आम्ही तुमच्या नावाचा धावा करू. |
|
| 19 |
|
| हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्हाला पुनर्स्थापित करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, तरच आमचे तारण होईल. |
|
|
|
|