मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या दोन पाट्यांप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार कर म्हणजे फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्याच्यावर लिहीन.
तुझ्याबरोबर कोणी चढून वर येऊ नये पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी मनुष्य दिसू नये; तसेच शेरडेमेंढरे कळप व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या पायथ्याशी चरू देऊ नकोस.”
तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार केल्या; सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सीनाय पर्वतावर चढून गेला;
हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”
मग तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी कृपादृष्टी जर माझ्यावर झाली असेल तर तू आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत हे मला माहीत आहे; तरी आमचा अन्याय व पाप यांची तू आम्हांला क्षमा कर आणि आपले वतन म्हणून आमचा स्वीकार कर.”
मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
तू सावध राहा. या देशातील रहिवाशाबरोबर कोणत्याही प्रकारचे करारमदार करू नको; ते व्यभिचारी मतीने आपल्या देवामागे लागून त्यांना बलिदान करतील. त्यातल्या कोणी तुला बोलावले असता तुम्ही त्यांच्या बलिदानातले काही खाल.
त्यांच्या कन्यांची तुम्ही आपल्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवड कराल; त्यांच्या कन्या व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्यामागे जातील आणि त्या तुमच्या पुत्रांना व्यभिचारी बुध्दीने त्यांच्या नादी लावतील.
बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात मिसर देशातून तू बाहेर निघालास.
गाढवीचे पहिले शिंगरु खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे, पण त्यास तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावा. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन; मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन; आणि वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यामोर हजर राहायला जाशील त्या वेळी तुझ्या देशाचा कोणीही लोभ धरणार नाही.
हंगामाच्या वेळी तुझ्या जमिनीच्या उत्पन्नातील प्रथम पिकाचा सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर, ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”
मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून ठेवल्या.
मग मोशे, साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्यास भान नव्हते.
जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्यासमोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे; मग तो इस्राएल लोकांकडे बाहेर येऊन परमेश्वर जी काही आज्ञा देई ती तो त्यांना सांगत असे.
मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे.