नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकरनोकरांच्या घरांत, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यांत आणि काथवटींत बेडूकच बेडूक होतील;
मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “परमेश्वराला विनवणी करा की, माझ्यापासून आणि माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावेत, म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यासाठी मी तुमच्या लोकांना जाऊ देईन.”
मोशे फारोला म्हणाला, “तुझ्यापासून व तुझ्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावेत म्हणून मी तुझ्यासाठी, तुझ्या सेवकांसाठी आणि तुझ्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी, हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.”
त्यांनी तसे केले; अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारली तेव्हा मनुष्यांवर आणि पशूंवर उवा झाल्या; सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या.
नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की, “पहाटेस ऊठ आणि जाऊन फारोपुढे उभा राहा; तो त्या वेळी नदीवर येईल; तू त्याला सांग, ‘परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यांना जाऊ दे.’
माझ्या लोकांना जाऊ देणार नाहीस तर पाहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर, आणि तुझ्या घरात मी गोमाश्यांचे थवे पाठवीन; मिसरी लोकांची घरे व ते राहतात ती सर्व भूमी गोमाश्यांच्या थव्यांनी व्यापून जाईल.
त्याप्रमाणे परमेश्वराने केले; फारोच्या वाड्यात, त्याच्या सेवकांच्या घरांत आणि सगळ्या मिसर देशात गोमाश्यांचे थव्यांचे थवे आले; गोमाश्यांच्या ह्या थव्यांनी देशाची खराबी झाली.
मोशे म्हणाला, “असे करणे उचित नाही, कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर ह्याला करणार आहोत त्याची मिसरी लोकांना किळस येईल. मिसरी लोकांच्या दृष्टीने किळसवाणा यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्यांदेखत केल्यास ते आम्हांला दगडमार करायचे नाहीत काय?
मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो की, फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावरील गोमाश्यांचे थवे उद्या निघून जावेत; मात्र परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास लोकांना जाऊ न देण्यासंबंधी फारोने पुनरपि वंचना करू नये.”
परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले; फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावर आलेले गोमाश्यांचे थवे त्याने दूर केले; एकही गोमाशी राहिली नाही.