फारोने बारकाईने चौकशी केली आणि पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मरण पावले नव्हते. तरीपण फारोचे मन कठीणच राहिले. त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा; आणि त्यास सांग की इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो, माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.
कारण या वेळेस मी आपल्या सर्व पीडा तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर पाठवीन म्हणजे सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी देव नाही, हे यावरुन तुला कळेल.
म्हणून उद्या याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरावर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही.
तर आता माणसे पाठवून रानांतून तुझी गुरेढोरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. कारण जर एखादा मनुष्य किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यावर गारांचा भडीमार पडेल.”
परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरुवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”
तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला.
त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसर देशात, मनुष्ये, गुरेढोरे वगैरे जे काही वनांत होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतांतील सर्व वनस्पतींवर मारा झाला. तसेच वनांतील सर्व मोठमोठी झाडे मोडून पडली.
मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.
मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली, आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.