|
| 1 |
|
| चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. |
|
| 2 |
|
| श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे. |
|
| 3 |
|
| सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो. |
|
| 4 |
|
| याहवेहचे भय ही नम्रता आहे; त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे. |
|
| 5 |
|
| दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात; परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात. |
|
| 6 |
|
| लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा, म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत. |
|
| 7 |
|
| जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो. |
|
| 8 |
|
| जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल. |
|
| 9 |
|
| उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात. |
|
| 10 |
|
| टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल; भांडण आणि अपमान देखील बंद होतील. |
|
| 11 |
|
| जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो तो राजाचा मित्र होईल. |
|
| 12 |
|
| याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात, परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात. |
|
| 13 |
|
| आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! तो मला भर चौकात ठार करेल!” |
|
| 14 |
|
| वेश्येचे मुख खोल खड्डा आहे; ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात. |
|
| 15 |
|
| बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते, परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल. |
|
| 16 |
|
| श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील. |
|
| 17 |
|
| लक्ष दे आणि सुज्ञानाचा बोलण्याकडे तुझे कान वळव; मी जे शिक्षण देतो त्याचे तुझ्या हृदयापासून पालन कर, |
|
| 18 |
|
| जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील आणि ते सर्व तुला मुखाग्र असतील तर तुला आनंद मिळेल. |
|
| 19 |
|
| म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील, मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा. |
|
| 20 |
|
| सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय? |
|
| 21 |
|
| प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील? |
|
| 22 |
|
| गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका, |
|
| 23 |
|
| कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील. |
|
| 24 |
|
| तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका, |
|
| 25 |
|
| नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल. |
|
| 26 |
|
| वचन देऊन हात मिळवणी करणार्यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका; |
|
| 27 |
|
| जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील. |
|
| 28 |
|
| ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका. |
|
| 29 |
|
| आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का? ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्यांसमोर नाही तर राजांसमोर सेवा करतील. |
|
|
|
|