|
| 1 |
|
| कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात. |
|
| 2 |
|
| जेव्हा एखादे राष्ट्र बंडखोर असते, तेव्हा तिथे अनेक शासक असतात, परंतु विवेकशील आणि ज्ञानी शासक सुव्यवस्था कायम ठेवतो. |
|
| 3 |
|
| गरीब लोकांवर जुलूम करणारा पुरुष, संपूर्ण पीक वाहून नेणार्या घनघोर वृष्टिसारखा आहे. |
|
| 4 |
|
| नियमशास्त्राचा तिरस्कार करणारे दुर्जनांची स्तुती करतात, परंतु ते पालन करणारे, त्यांचा विरोध करतात. |
|
| 5 |
|
| योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही, परंतु जे याहवेहचा शोध घेतात, त्यांना ते पूर्णपणे समजते. |
|
| 6 |
|
| विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा प्रामाणिकपणाने चालणारा गरीब मनुष्य बरा. |
|
| 7 |
|
| सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो, परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो. |
|
| 8 |
|
| जो गरिबांकडून व्याज किंवा फायदा घेऊन संपत्ती वाढवितो, ती दुसर्याकरिता साठवितो, जो गरिबांवर दया दाखवेल. |
|
| 9 |
|
| जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला, तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात. |
|
| 10 |
|
| जे कोणी नीतिमानाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात, ते स्वतःच्याच जाळ्यात सापडतील, परंतु निर्दोष माणसांना उत्तम वारसा मिळेल. |
|
| 11 |
|
| श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात; परंतु जो गरीब आणि विवेकी आहे तो पाहतो की श्रीमंत कसे भ्रमात पडलेले आहेत. |
|
| 12 |
|
| नीतिमान यशस्वी झाला तर हर्षोल्हास केला जातो; पण दुष्ट प्रबल झाले असता लोक स्वतःस लपवून ठेवतात. |
|
| 13 |
|
| जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते. |
|
| 14 |
|
| परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य, परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो. |
|
| 15 |
|
| असहाय लोकांवर राज्य करणारा दुष्ट राजा गर्जणार्या सिंहासारखा किंवा आक्रमक अस्वलासारखा असतो. |
|
| 16 |
|
| जुलमी शासनकर्ता खंडणी वसूल करतो, परंतु जो कुमार्गाने मिळविलेल्या लाभाची घृणा करतो, तो पुष्कळ वर्षे राज्य करेल. |
|
| 17 |
|
| मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य कबरेमध्ये आसरा शोधेल; त्याला कोणीही थांबवू नये. |
|
| 18 |
|
| जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो, परंतु ज्याचे मार्ग विकृत आहेत तो खड्ड्यात पडेल. |
|
| 19 |
|
| जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात त्यांच्यावर दारिद्र्य येईल. |
|
| 20 |
|
| प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल, पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही. |
|
| 21 |
|
| पक्षपात करणे हे चांगले नाही— तरीही भाकरीच्या एका तुकड्यासाठी मनुष्य चुकीची गोष्ट करतो. |
|
| 22 |
|
| कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात आणि त्यांना माहीत नसते की दारिद्र्य त्यांची वाट पाहत आहे. |
|
| 23 |
|
| खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल. |
|
| 24 |
|
| जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,” तो नाश करणार्याचा भागीदार आहे. |
|
| 25 |
|
| लोभी मनुष्य भांडणे लावतो, परंतु जे याहवेहवर भरवसा ठेवतात त्यांची भरभराट होईल. |
|
| 26 |
|
| स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे. पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील. |
|
| 27 |
|
| जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्यांवर पुष्कळ शाप येतील. |
|
| 28 |
|
| जेव्हा दुर्जन सामर्थ्यवान होतात, तेव्हा लोक लपून बसतात; परंतु दुष्टांचा नायनाट झाला कि नीतिमान वृद्धी पावतात. |
|
|
|
|