|
| 1 |
|
| माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. |
|
| 2 |
|
| माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील; माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. |
|
| 3 |
|
| ती आपल्या बोटांना बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव. |
|
| 4 |
|
| “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण; आणि सुज्ञतेला आपली जिवलग मैत्रीण म्हण; |
|
| 5 |
|
| त्यांच्या योगाने परस्त्रीपासून, गोड भाषण करणार्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल. |
|
| 6 |
|
| मी आपल्या घराच्या खिडकीजवळील जाळीतून बाहेर पाहिले तो, |
|
| 7 |
|
| भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला. |
|
| 8 |
|
| तो तिच्या घराच्या कोपर्याजवळून जाणार्या आळीतून फिरत होता; तो तिच्या घराकडच्या वाटेने |
|
| 9 |
|
| संध्याकाळी दिवस मावळता, रात्रीच्या काळोखात, निबिड अंधकारात गेला. |
|
| 10 |
|
| तेव्हा वेश्येचा पोशाख केलेली कोणीएक कावेबाज स्त्री त्याला भेटली. |
|
| 11 |
|
| ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत; |
|
| 12 |
|
| कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते. |
|
| 13 |
|
| तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले; तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले, |
|
| 14 |
|
| “मला शांत्यर्पणे करायची होती; मी आपले नवस आज फेडून चुकले. |
|
| 15 |
|
| ह्यासाठी तुला भेटायला व तुझे मुख पाहायला, मी बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस. |
|
| 16 |
|
| मी आपला पलंग वेलबुट्टीदार गिरद्यांनी, मिसरी तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजवला आहे. |
|
| 17 |
|
| मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी, ह्यांनी सुवासिक केली आहे. |
|
| 18 |
|
| ये, चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू. |
|
| 19 |
|
| कारण घरधनी घरी नाही, तो दूरच्या प्रवासाला गेला आहे; |
|
| 20 |
|
| त्याने पैशांची पिशवी बरोबर नेली आहे; तो पौर्णिमेस घरी येईल.” |
|
| 21 |
|
| तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले. |
|
| 22 |
|
| तो तत्काळ तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, तसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो. |
|
| 23 |
|
| जसा पक्षी, पाश आपला जीव घेण्यासाठी आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो; पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जातो. |
|
| 24 |
|
| तर माझ्या मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडच्या वचनांकडे लक्ष द्या. |
|
| 25 |
|
| तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस, तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस. |
|
| 26 |
|
| कारण तिने बहुतांना घायाळ करून पाडले आहे; तिने वधलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे. |
|
| 27 |
|
| तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्यांकडे, खाली उतरण्याचा मार्ग होय. |
|
|
|
|