|
| 1 |
|
| सुज्ञान हाक मारीत नाही काय? समंजसपणा तिचा आवाज उंचावत नाही का? |
|
| 2 |
|
| रस्त्याच्या कडाला असलेल्या सर्वात उंच जागेवर, जिथे रस्ते जोडले जातात, तिथे ती उभी राहते; |
|
| 3 |
|
| शहरात जाणार्या वेशीच्या बाजूला, प्रवेशद्वाराजवळ ती ओरडून सांगते: |
|
| 4 |
|
| “अहो लोकांनो, मी तुम्हाला बोलाविते; सर्व मानवजातीला उद्देशून मी माझा आवाज उंचाविते. |
|
| 5 |
|
| तुम्ही जे साधे भोळे आहात, समंजसपणा मिळवा; तुम्ही जे मूर्ख आहात, तुमचे लक्ष तिच्याकडे लावा. |
|
| 6 |
|
| ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत; योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते. |
|
| 7 |
|
| माझे मुख सत्य बोलते, कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात. |
|
| 8 |
|
| माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत. |
|
| 9 |
|
| जे समजूतदार आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहेत; ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांना माझी वचने सुबोध आहेत. |
|
| 10 |
|
| चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची, आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.” |
|
| 11 |
|
| कारण सुज्ञान माणकांपेक्षा उत्तम आहे; तुला आवडणाऱ्या इतर कशाशीही तिची तुलना करता येणार नाही. |
|
| 12 |
|
| मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते; ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत. |
|
| 13 |
|
| याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते. |
|
| 14 |
|
| सल्ला आणि अचूक न्याय माझे आहेत; माझ्याकडे अंतर्ज्ञान आणि शक्ती आहे. |
|
| 15 |
|
| माझ्याद्वारे राजे राज्य करतात, आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात; |
|
| 16 |
|
| माझ्याच साहाय्याने अधिपती, आणि थोर—पृथ्वीवरील सर्व नीतिमान शासक अधिकार चालवितात. |
|
| 17 |
|
| जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते, आणि जे माझा शोध घेतात त्यांना मी सापडते. |
|
| 18 |
|
| माझ्याजवळ समृद्धी आणि सन्मान, कायम टिकणारी संपत्ती आणि वैभव आहे. |
|
| 19 |
|
| माझे फळ शुद्ध सोन्यापेक्षा चांगले आहे; आणि माझ्याद्वारे उत्पन्न झालेले उत्कृष्ट चांदीपेक्षा उत्तम आहे. |
|
| 20 |
|
| मी नीतिमत्वाच्या मार्गाने चालते, आणि न्याय्यमार्गाला धरून राहते, |
|
| 21 |
|
| माझ्यावर प्रीती करणाऱ्यांना मी समृद्ध वारसा देते. आणि त्यांची भांडारे मी भरून टाकते. |
|
| 22 |
|
| याहवेहनी त्यांच्या सृष्टी निर्मितीमध्ये, त्यांच्या पुरातन कार्यापूर्वी सर्वप्रथम माझी रचना केली; |
|
| 23 |
|
| अनादिकालापासून माझी रचना केलेली होती. जेव्हा जग अस्तित्वात आले तेव्हाच. |
|
| 24 |
|
| जेव्हा महासागर नव्हते, माझा जन्म झाला होता, तेव्हा ओसांडून वाहणारे झर्यांचे पाणीही नव्हते; |
|
| 25 |
|
| पर्वत त्यांच्या जागेवर स्थिर झाले नव्हते, डोंगर निर्माण होण्यापूर्वी माझा जन्म झाला होता, |
|
| 26 |
|
| त्यांनी पृथ्वी किंवा तिच्यावरील शेती किंवा पृथ्वीवरील धूळ निर्माण करण्यापूर्वी, |
|
| 27 |
|
| त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले, जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते, |
|
| 28 |
|
| जेव्हा त्यांनी वर अंतराळात ढगांची प्रस्थापना केली आणि पृथ्वीगर्भातील झर्यांना घट्ट बसविले, |
|
| 29 |
|
| जेव्हा त्यांनी सागरांना त्यांच्या मर्यादा घालून दिल्या, जेणेकरून पाणी त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही. जेव्हा त्यांनी पृथ्वीचा पाया घातला, |
|
| 30 |
|
| तेव्हा मी सतत त्यांच्याभोवती होते; दिवसेंदिवस मी आनंदाने भरून गेले होते. नेहमी त्यांच्या उपस्थितीचा आनंद मी घेत होते, |
|
| 31 |
|
| त्यांच्या संपूर्ण जगामध्ये मी आनंदात आहे आणि मानवजातीमध्ये आनंद करीत आहे. |
|
| 32 |
|
| “आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका, कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात. |
|
| 33 |
|
| माझे शिक्षण कान देऊन ऐका आणि शहाणे व्हा; त्याचा अव्हेर करू नका. |
|
| 34 |
|
| जे व्यक्ती माझे ऐकतात ते धन्य आहेत, ते रोज माझ्या दारांवर लक्ष ठेऊन, माझ्या दारावर प्रतीक्षा करतात. |
|
| 35 |
|
| कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते, आणि त्याला याहवेहकडून कृपादृष्टी मिळते. |
|
| 36 |
|
| परंतु जे माझा शोध घेण्यास चुकतात, ते स्वतःचे नुकसान करून घेतात; जे सर्व माझा तिरस्कार करतात, ते मृत्यूची आवड धरतात.” |
|
|
|
|