बोलण्याची घाई करू नकोस; देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नकोस; कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस; म्हणून तुझे बोलणे अल्प असावे.
तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नकोस. मी चुकून बोललो असे दिव्यदूतासमोर म्हणू नकोस; तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावीत?
एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व नीतिमत्ता ह्यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नकोस; कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो.
मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे: मनुष्याने खावे, प्यावे व ह्या भूतलावर जे श्रम तो करतो त्या सर्वांत देवाने त्याला दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे; कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे.
कोणा मनुष्याला देवाने धनसंपत्ती दिली असेल, तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल, तर ही देवाची देणगीच समजावी.