प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही; मरणदिवस कोणाच्या स्वाधीन नाही; हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही.
त्या वेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठमाती मिळून ते विराम पावतात; नीतीने वागणार्यांना पवित्रस्थान सोडून जावे लागते, आणि नगरातील लोक त्यांना विसरून जातात; हेही व्यर्थ.
पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते: असे काही नीतिमान लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; आणि असे काही दुर्जन असतात की नीतिमानांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; हेही व्यर्थ! असे मी म्हटले.
मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.
मग ज्ञानाची ओळख करून घेण्याकडे व पृथ्वीवर चालू असलेला उद्योग पाहण्याकडे मी आपले चित्त लावले; कारण अहोरात्र ज्यांचा डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात.
मग मी देवाच्या सर्व कार्याकडे लक्ष दिले, तेव्हा असे दिसून आले की भूतलावर जे काही कार्य चालले आहे ते मनुष्याला कळत नाही; शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही; ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन; तर त्यालाही त्याचा थांग लागायचा नाही.