सोराविषयीची देववाणी: तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा; त्याचा विध्वंस झाला आहे; तेथे आता घरदार किंवा बंदर राहिले नाही; कित्ती लोकांच्या देशातून त्यांना ही खबर कळली.
खास्द्यांचा देश पाहा, तो आता राष्ट्र नाही; त्यांची भूमी अश्शूर्यांनी वनचरांसाठी सोडली आहे; त्यांनी मोर्चे लावून तिचे महाल जमीनदोस्त करून ती उद्ध्वस्त केली आहे.
त्या दिवशी असे होईल की एकाच राजाच्या कारकिर्दीच्या इतकी म्हणजे सत्तर वर्षे सोराची विस्मृती पडेल; सत्तर वर्षे संपल्यावर वेश्येच्या ह्या गाण्यात सांगितल्याप्रमाणे सोराचे होईल:
तिच्या व्यापाराची प्राप्ती व तिची कमाई परमेश्वराला समर्पून पवित्र होईल; ती भांडारात ठेवणार नाहीत; तिचा संचय करणार नाहीत; तर जे परमेश्वराच्या सन्निध असतात त्यांना भरपूर खाण्यास मिळावे व त्यांनी उंची वस्त्रे ल्यावीत म्हणून तिच्या व्यापाराची प्राप्ती त्यांच्या कामी लागेल.