मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन; आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता;
तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली, आणि त्यात एक बुरूज बांधला व द्राक्षकुंड खोदले; मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली.
आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हांला सांगतो: मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो खाऊन टाकतील; त्याचे आवार मोडीन म्हणजे तो तुडवला जाईल.
कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.
ते म्हणतात, “त्याने त्वरा करावी, आपले कार्य शीघ्र करावे म्हणजे आम्हांला ते पाहायला मिळेल; इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा संकल्प लवकर पूर्ण होवो, म्हणजे आम्हांला त्याचा अनुभव घडेल.”
ह्यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते तसे त्यांचे मूळ कुजलेल्या पदार्थासारखे होईल; त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल; कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे नियमशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे वचन अव्हेरले आहे.
ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.