ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांना भजण्यास त्यांच्यामागे जातात म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल.
इस्राएलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कंबरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो.
ह्यास्तव त्यांना हे वचन सांग: ‘परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे;”’ ते तुला म्हणतील, ‘प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे हे आम्हांला ठाऊक नाही काय?’
तेव्हा त्यांना तू सांग, ‘पाहा, परमेश्वर म्हणतो, मी ह्या देशाचे सर्व रहिवासी म्हणजे दाविदाच्या गादीवर बसणारे राजे, याजक, संदेष्टे व सर्व यरुशलेमनिवासी ह्यांना मद्याने मस्त करीन.
त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’
परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.
पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील.
ज्यांचा स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न तू केला त्यांना त्याने तुझ्या शिरावर ठेवले तर तू काय म्हणशील? प्रसववेदना लागलेल्या स्त्रीप्रमाणे तुला क्लेश होणार नाहीत काय?
‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत.
तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”