पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| फारोने गज्जावर मारा केला त्यापूर्वी पलिष्ट्यांविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे: |
| 2 |
| “परमेश्वर म्हणतो, पाहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा बनत आहे; देश व त्यातील सर्वकाही, नगर व त्यातले रहिवासी ह्या सर्वांना तो तुडवील; लोक आक्रोश करतील, देशातले सर्व रहिवासी हायहाय करतील. |
| 3 |
| त्याच्या घोड्यांच्या खुरांच्या टापामुळे, त्याच्या रथांच्या नादामुळे व त्याच्या चाकांच्या घडघडाटाने वडिलांचे हात गळाल्यामुळे ते मागे वळून आपल्या मुलांकडेसुद्धा पाहायचे नाहीत. |
| 4 |
| पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस येत आहे; सोर व सीदोन ह्यांना साहाय्य करणारा जो कोणी उरला असेल त्याचा उच्छेद होईल; परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोर द्वीपांतील अवशिष्ट लोकांचा नाश करणार आहे. |
| 5 |
| गज्जाचे वपन झाले आहे; त्यांच्या खोर्यांतले उरलेले अष्कलोन नष्ट झाले आहे; तू कोठवर आपणास जखमा करून घेशील? |
| 6 |
| हे परमेश्वराच्या तलवारी, तू केव्हा स्वस्थ राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. विराम पाव व स्वस्थ राहा! |
| 7 |
| परमेश्वराने तिला आज्ञा केली आहे; तर ती कशी स्वस्थ राहील? अष्कलोन व समुद्रकिनारा ह्यांवर तिला त्याने नेमले आहे.” |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/jeremiah/047.mp3
52
47