“मानवपुत्रा, इस्राएलचे संदेष्टे जे आता भविष्यवाणी करीत आहेत त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग. जे आपल्याच स्वतःच्या कल्पनेनुसार भविष्य करतात त्यांना सांग: ‘याहवेहचे वचन ऐका!
त्यांचे दृष्टान्त खोटे आहेत आणि त्यांचे शकुन लबाड आहेत. जरी त्यांना याहवेहने पाठवले नाही, तरी ते म्हणतात, “याहवेह जाहीर करतात,” आणि याहवेहने त्यांच्या शब्दाची पूर्तता करावी अशी अपेक्षा बाळगतात.
जे खोटे दृष्टान्त पाहतात आणि लबाड शकुन उच्चारतात, मी माझा हात त्या संदेष्ट्यांच्या विरुद्ध उगारणार. ते माझ्या लोकांच्या बैठकीचा भाग नसतील किंवा इस्राएलच्या यादीत त्यांची नोंद केली जाणार नाही, ना ते इस्राएलच्या देशात प्रवेश करतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.
तुम्ही चुन्याचा लेप लावलेली भिंत मी पाडून टाकेन आणि ती धुळीस मिळवेन, म्हणजे तिचा पाया उघडा पडेल. जेव्हा ती पडेल तेव्हा तिच्याबरोबर तुमचाही नाश होईल; आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
याप्रकारे त्या भिंतीविरुद्ध व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला त्यांच्याविरुद्ध मी माझा क्रोध ओतेन. मी तुम्हाला म्हणणार, “भिंत गेली व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला ते सुद्धा गेले,
इस्राएलचे ते संदेष्टे ज्यांनी यरुशलेमविषयी भविष्यवाणी केली आणि शांती नसतानाही शांती विषयी दृष्टान्त पाहिले त्यांच्याविषयी सार्वभौम याहवेह असे जाहीर करतात.” ’
आणि सांग, “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या स्त्रिया आपल्या मनगटांवर जादूच्या ताईत शिवून बांधतात आणि लोकांना फसविण्यासाठी आपल्या डोक्यासाठी वेगवेगळ्या लांबीचे बुरखे तयार करतात, त्या स्त्रियांचा धिक्कार असो. आपला जीव वाचवावा म्हणून तुम्ही माझ्या लोकांचा जीव पाशात टाकता काय?
तुम्ही मूठभर जवासाठी आणि भाकरीच्या तुकड्यांसाठी माझ्या लोकांमध्ये मला अपवित्र केले आहे. जे माझे लोक लबाड्या ऐकतात, त्यांच्याशी तुम्ही खोटे बोलला आहात, ज्यांनी मरू नये अशांना तुम्ही मारून टाकले आणि ज्यांनी जगू नये अशांना तुम्ही वाचविले आहे.
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जादूचे जे ताईत ज्याद्वारे तुम्ही माझ्या लोकांना पक्ष्यांसारखे फसविता, त्याविरुद्ध मी आहे आणि ते मी तुमच्या मनगटांवरून काढून टाकेन; तुम्ही पक्ष्यांप्रमाणे फसविलेल्या लोकांना मी मुक्त करेन.
मी तुमच्या डोक्यावरील बुरखे फाडून टाकीन आणि तुमच्या हातून माझ्या लोकांना वाचवेन आणि ते आणखी तुमच्या हाताच्या सामर्थ्याला बळी पडणार नाही. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
कारण ज्या नीतिमानास मी दुखविले नाही, त्यांना तुम्ही तुमच्या लबाड्यांनी निराश केले आहे आणि दुष्टांनी त्यांच्या कुमार्गापासून वळू नये म्हणून तुम्ही त्यांना उत्तेजन देत त्यांचा जीव वाचविता,
म्हणून यापुढे तुम्ही खोटे दृष्टान्त पाहणार नाही किंवा शकुन करणार नाही. माझ्या लोकांना मी तुमच्या हातून सोडवेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”