मी तुला उपडे पाडेन, तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझे घोडे व संपूर्ण हत्यारबंद असलेले घोडेस्वार आणि मोठ्या व लहान ढाली घेतलेल्या लोकांचा मोठा समूह, सर्व धनुर्धारी यासर्वांसह मी तुला बाहेर काढेन.
पुष्कळ दिवस गेल्यानंतर तुला बोलाविण्यात येईल. येत्या काळात जो देश युद्धातून परत आलेला आहे, ज्याचे लोक पुष्कळ राष्ट्रांतून इस्राएलच्या पर्वतांकडे एकत्र केले आहेत. जो पुष्कळ काळ ओसाड पडला होता. त्यांना राष्ट्रांतून बाहेर आणले गेले आणि जे आता सुरक्षिततेत राहतात, तू त्या देशावर आक्रमण करशील.
मी त्यांना लुटेन व लुबाडून घेईन आणि माझा हात पुन्हा स्थायिक झालेल्या ओसाडीवर व राष्ट्रांतून एकत्र केलेले लोक, देशाच्या मधोमध राहणारी उत्तम गुरे आणि संपत्ती यावर पडेल.”
शबा, ददानचे लोक आणि तार्शीशचे व्यापारी व त्यांची सर्व गावे तुला म्हणतील, “तू लुटायला आला आहे काय? लूट घेण्यास, सोने व चांदी वाहून नेण्यास, गुरे व संपत्ती घेऊन नेण्यास व पुष्कळ लूट ताब्यात घेण्यासाठी तुझे पुष्कळ लोक तू एकत्र केले काय?” ’
“यास्तव, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि गोगला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी, जेव्हा माझे इस्राएली लोक सुरक्षिततेत राहात आहेत, त्यांची नोंद तू घेणार नाही काय?
मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तूच तो आहे, ज्याबद्दल मी पुरातन काळी माझ्या सेवकांद्वारे व इस्राएलच्या संदेष्ट्यांद्वारे बोललो होतो. त्यावेळी त्यांनी पुष्कळ वर्षे भविष्यवाणी केली की मी तुला त्यांच्याविरुद्ध आणेन.
समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, रानातील पशू, भूमीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक माझ्या समक्षतेत थरथर कापतील. पर्वत कोसळतील, कडे खचतील आणि प्रत्येक भिंत जमिनीवर पडेल.
मरी व रक्तपाताद्वारे मी त्याच्यावर न्याय आणेन; त्याच्यावर व त्याच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर असलेल्या पुष्कळ राष्ट्रांवर मी मुसळधार पाऊस, गारा व जळते गंधक ओतेन.