परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याच्याशी बोल व त्यास सांग की: त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो.
त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत:साठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा.
नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.
मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.
आणखी त्याने इस्राएली लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे या सर्वांबद्दल परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित करावे; परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वस्ती करतो त्या, लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने तसेच करावे.
अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्रस्थानात प्रवेशकरण्यासाठी जाईल तेव्हा, तो स्वतःसाठी व स्वत:च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपामध्ये कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये.
मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.
मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.
पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.
तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये, मग तो तुमच्यात जन्मलेल्यांपैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशी असो;
हे यासाठी की या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल.
इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधी होय; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.