त्यांनी आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये; ते परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणजे आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करीत असतात; म्हणून त्यांनी पवित्र राहावे.
त्यांनी वेश्येला किंवा भ्रष्ट झालेल्या स्त्रीला आपली बायको करून घेऊ नये, आणि नवर्याने टाकलेल्या स्त्रीशी लग्न करू नये, कारण याजक आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र आहे.
आपल्या भावांमध्ये जो मुख्य याजक आहे, ज्याच्या मस्तकाला अभिषेकाच्या तेलाचा अभ्यंग झाला आहे आणि पवित्र वस्त्रे परिधान करण्यासाठी ज्याच्यावर संस्कार झाला आहे, त्याने आपल्या डोक्याचे केस सोडू नयेत व आपली वस्त्रे फाडू नयेत;
त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये; आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करू नये, कारण त्याच्या देवाच्या तैलाभिषेकाने त्याच्यावर संस्कार झाला आहे; मी परमेश्वर आहे.
विधवा, टाकलेली स्त्री, भ्रष्ट झालेली स्त्री अथवा वेश्या ह्यांच्यापैकी कोणालाही त्याने बायको करून घेऊ नये, तर त्याने आपल्या स्वजनातील एखाद्या कुमारिकेशीच विवाह करावा.
अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणात असे एखादे व्यंग असले तर त्याने परमेश्वराला हव्य अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये; त्याच्यात व्यंग आहे; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये.