ओबद्याला झालेला दृष्टान्त: अदोमाविषयी प्रभू परमेश्वराने हे म्हटले: परमेश्वरापासून आम्ही हे वर्तमान ऐकले आहे; एक जासूद राष्ट्रांमध्ये पाठवला आहे; तो म्हणतो, “उठा, आपण त्यांच्याबरोबर लढायला जाऊ.”
तुझ्यावर चोर आले, रात्री लुटारू आले, तर त्यांना हवे तेवढेच ते घेतील, नाही काय? द्राक्षे खुडणारे तुझ्याकडे आले, तर ते सरवा नाही का ठेवणार? पण तुझी तर किती नासाडी झाली आहे!
तुझ्याबरोबर करारमदार केलेल्यांनी तुला सीमेवर लावून दिले आहे; तुझ्याबरोबर सल्ला केलेल्यांनी तुला फसवले आहे, ते तुझ्यावर प्रबल झाले आहेत. तुझे अन्न खाणार्यांनी तुझ्यासाठी जाळे पसरले आहे; अदोमात समज मुळीच नाही.
ज्या दिवशी तू अलग राहिलास, ज्या दिवशी परके त्याची मालमत्ता घेऊन गेले, परदेशीयांनी त्याच्या वेशीत शिरून यरुशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकल्या, त्या दिवशी तूही त्यांतला एक होतास.
तू आपल्या भावाचा संकटसमय व त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नकोस आणि यहूदाच्या वंशजांना नाशसमय प्राप्त झाला असता तुला आनंद वाटू देऊ नकोस; संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नकोस.
माझ्या लोकांच्या विपत्काळी त्यांच्या वेशीत शिरू नकोस, त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहून संतोष मानू नकोस, त्यांच्या विपत्काळी त्यांच्या मालमत्तेस हात लावू नकोस.
याकोबाचे घराणे अग्नी होईल, योसेफाचे घराणे ज्वाला होईल व एसावाचे घराणे धसकट होईल; ते त्यांच्यात पेट घेऊन त्यांना खाऊन टाकतील, एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही; कारण परमेश्वर असे बोलला आहे.
दक्षिणेतील लोक एसावाच्या पहाडाचा ताबा घेतील; तळवटी तले लोक पलिष्ट्यांवर सत्ता चालवतील; ते एफ्राइमाचे क्षेत्र व शोमरोनाचे क्षेत्र ताब्यात घेतील व बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल.
इस्राएलवंशजांच्या ह्या सैन्यातले बंदिवान झालेले लोक कनान्यांचे सारफथापर्यंतचे वतन ताब्यात घेतील आणि यरुशलेमेतून बंदिवान करून सफारदात नेण्यात आलेले लोक दक्षिणेतल्या नगरांचा ताबा घेतील.