यहूदाचा राजा आमोन ह्याचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दित सफन्या बिन कूशी बिन गदल्या बिन अमर्या बिन हिज्कीया ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे:
“मी मनुष्य व पशू नष्ट करीन; मी आकाशातले पक्षी, समुद्रातले मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीतसे करीन; भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो.
“मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाशांवर चालवीन; ह्या स्थलांतून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तींचे पुजारी व याजक ह्यांचे नावही नाहीसे करीन;
प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा! कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे, त्याने आपल्या आमंत्रितांना पवित्र केले आहे.
त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.
हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे.
परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.