दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी, सहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस यहूदाचा प्रांताधिकारी शल्तीएल ह्याचा पुत्र जरूब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा ह्यांना हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे:
तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो.
तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले; जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली; हे का, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात.
तेव्हा शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा ह्यांनी सर्व अवशिष्ट लोकांसह आपला देव परमेश्वर ह्याच्या वाणीस मान दिला, आपला देव परमेश्वर ह्याने पाठवलेल्या हाग्गय संदेष्ट्याची वचने मानली आणि ते लोक परमेश्वराचे भय धरू लागले.
यहूदाचा प्रांताधिकारी शल्तीएल ह्याचा पुत्र जरूब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाक ह्याचा पुत्र यहोशवा व सर्व अवशिष्ट लोक ह्यांच्या आत्म्यांना परमेश्वराने स्फूर्ती दिली; तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर ह्याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले;