पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| शब्बाथ संपल्यानंतर मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी जाऊन येशूंच्या शरीराला अभिषेक करावा म्हणून सुगंधी मसाले विकत आणले. |
| 2 |
| आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस, सूर्योदय झाल्यावर त्या कबरेकडे जाण्यास निघाल्या. |
| 3 |
| “आपल्यासाठी कबरेच्या द्वाराशी असलेली धोंड कोण बाजूला करेल?” याविषयी त्या आपसात चर्चा करीत होत्या. |
| 4 |
| त्यांनी वर पाहिले तेव्हा जी धोंड अतिशय मोठी होती, ती प्रवेशद्वारातून बाजूला लोटलेली आहे असे त्यांना दिसले. |
| 5 |
| त्यांनी कबरेच्या आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला चमकदार पांढरी वस्त्रे परिधान केलेला एक तरुण तिथे बसला होता हे पाहून त्या भयभीत झाल्या. |
| 6 |
| “भिऊ नका,” तो म्हणाला, “क्रूसावर खिळलेल्या ज्या नासरेथकर येशूंना तुम्ही शोधीत आहात. ते येथे नाहीत, ते पुन्हा उठले आहेत. त्यांना ठेवले होते ती जागा पाहा! |
| 7 |
| पण जा, ही बातमी त्यांच्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांगा, ‘ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. जसे त्यांनी तुम्हाला सांगितले होते तसे ते तिथे तुम्हाला भेटतील.’ ” |
| 8 |
| भयभीत होऊन व थरथर कापत त्या स्त्रिया कबरेपासून पळाल्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या घाबरल्या होत्या. |
| 9 |
| येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे पुनरुत्थित झाले. ते सर्वप्रथम ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती त्या मग्दालिया मरीयेला प्रकट झाले. |
| 10 |
| जे लोक येशूंबरोबर होते आणि जे शोक व विलाप करीत होते, त्यांच्याकडे जाऊन तिने हे वर्तमान त्यांना सांगितले. |
| 11 |
| येशू जिवंत आहे आणि तिने त्यांना प्रत्यक्ष बघितले होते, हे जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. |
| 12 |
| नंतर त्याच दिवशी शहरातून चाललेल्या दोघांना येशूंनी वेगळ्या रूपात दर्शन दिले. |
| 13 |
| ते परत आले व इतरांना अहवाल दिला, परंतु त्यांच्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नाही. |
| 14 |
| नंतर अकरा शिष्य भोजन करण्यास बसले असताना, येशू त्यांना प्रकट झाले. ज्यांनी त्यांना मरणातून उठलेले पाहिले होते, त्यांच्या वार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांनी अविश्वास व हृदयाच्या कठीणपणा बद्दल त्यांचा निषेध केला. |
| 15 |
| ते त्यांना म्हणाले, “सर्व सृष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला शुभवार्तेचा प्रचार करा. |
| 16 |
| जे विश्वास ठेवतील आणि बाप्तिस्मा घेतील, त्यांचे तारण होईल. पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील, ते दंडास पात्र ठरतील. |
| 17 |
| आणि विश्वास ठेवणार्याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील. |
| 18 |
| ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.” |
| 19 |
| प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर, ते स्वर्गात वर घेतले गेले आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसले. |
| 20 |
| मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती. |
|
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/mark/016.mp3
16
16