सम्राट तिबिर्य ह्याच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहुदियाचा राज्यपाल होता. हेरोद गालीलचा राज्यकर्ता, त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया व त्राखोनीती ह्या प्रांतांचा राज्यकर्ता व लूसनिय अबिलेनेचा राज्यकर्ता होता.
तो यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत फिरला. हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले, ते असे:
तुमचा पश्चात्ताप दिसून येईल अशी सत्कृत्ये करा आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे आपल्या मनात म्हणू नका कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामसाठी मुले निर्माण करायला देव समर्थ आहे!
तो त्यांना उत्तर देत असे, “ज्याच्याजवळ दोन सदरे आहेत, त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला एक द्यावा आणि ज्याच्याजवळ अन्न आहे, त्याने त्यात दुसऱ्यांना सहभागी करावे.”
योहान त्या सर्वांना उत्तर देत असे, “मी तर तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडायलाही मी पात्र नाही, तो येत आहे. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देइल.