तेथे जन्मापासून पांगळा असलेला एक माणूस होता. मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागता यावी म्हणून त्याला दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत.
मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच, हे त्यांनी ओळखले, तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडले त्यावरून सर्वांना फार आश्चर्य व विस्मय वाटला.
हे पाहून पेत्राने लोकांना विचारले, “अहो इस्राएली लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? आमच्याकडे निरखून का पाहता? आम्ही आमच्या शक्तीने किंवा धार्मिकतेने ह्याला चालावयास लावले, असे तुम्ही समजता काय?
अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने त्याचा सेवक येशू ह्याचा गौरव केला आहे. मात्र तुम्ही त्याला अधिकाऱ्यांच्या हाती सोपविले. पिलातने त्याला सोडून देण्याचे ठरवले असतानाही त्याच्यासमक्ष तुम्ही येशूला नाकारले.
त्याच्याच नावावरील विश्वासामुळे व त्याच्याच नावाच्या सामर्थ्याने ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला सुदृढ केले आहे. त्याच्यावरील श्रद्धेने ह्याला तुम्हां सर्वांसमक्ष हे स्वास्थ्य प्राप्त झाले आहे.
सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्याद्वारे सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे आवश्यक आहे.
मोशेनेही म्हटले आहे, प्रभू तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून पाठवील, तो जे काही तुम्हांला सांगेल, त्याप्रमाणे सर्व गोष्टींत त्याचे ऐका.
तुम्ही संदेष्ट्यांची संतती आहात आणि देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या करारातही तुम्ही सहभागी आहात. देवाने अब्राहामला सांगितल्याप्रमाणे ‘तुझ्या संततीमधून पृथ्वीवरील सर्व लोकांना आशीर्वाद प्राप्त होईल’.
म्हणूनच देवाने त्याच्या सेवकाला पुनरुत्थित करून प्रथम तुमच्याकडे पाठविले, कारण त्याने तुम्हां प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून परावृत्त होण्यासाठी आशीर्वाद द्यावा.”