दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो यशस्वी होतो किंवा अयशस्वी ठरतो हा त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर यशस्वी करण्यात येईल कारण त्याला यशस्वी करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.
कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसांपेक्षा अधिक श्रेयस्कर मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी.
जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो; जो खातो तो प्रभूकरता खातो कारण तो देवाचे आभार मानतो आणि जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही आणि तोही देवाचे आभार मानतो.
तर मग केवळ शाकाहार करणारा तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा सर्व काही खाणारा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: प्रभू म्हणतो, ‘ज्याअर्थी मी जिवंत आहे, त्याअर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघे टेकील व प्रत्येक जीभ मी देव आहे, हे कबूल करील.’
ह्या बाबतीत तुझ्यामध्ये जो विश्वास आहे, तो तू देवासमक्ष स्वत:साठी ठेव. आपणाला जे काही योग्य वाटते ते केल्यामुळे त्याविषयी ज्याच्या मनात दोषभावना निर्माण होत नाही तो धन्य!