तर मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरिता घोषित करण्यात आलेला आहे किंवा सुंता न झालेल्यांकरिताही आहे? आम्ही असे म्हणतो, “विश्वास हा अब्राहामसाठी नीतिमत्व असा गणण्यात आला होता”.
त्याला त्याच्या विश्वासामुळे जे नीतिमत्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण त्याला मिळाली. म्हणून, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने पूर्वज व्हावे.
आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही पूर्वज व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे तर आपला पूर्वज अब्राहाम त्याची सुंता होण्यापूर्वी त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून ते चालतात म्हणून त्यांचाही त्याने बाप व्हावे.
ह्या कारणामुळे ते अभिवचन कृपेवर आधारित असावे म्हणून ते श्रद्धेवर अवलंबून असते. अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहाम ह्याचा जो विश्वास होता, त्याच्या श्रद्धेत जे सहभागी होतात, त्यांनाही उपलब्ध व्हावे.
‘मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे’, असे अब्राहामविषयी धर्मशास्त्रात जे लिहिलेले आहे, त्याप्रमाणे तो देवासमक्ष आपल्या सर्वांचा बाप आहे. त्याने जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला आज्ञा करून अस्तित्वात आणतो, अशा देवावर विश्वास ठेवला.
आपल्या शरीराची वयोवृद्ध अवस्था (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाची अक्षमता ह्या गोष्टी लक्षात घेऊनही तो विश्वासात दुर्बल झाला नाही.
तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीदेखील ते लिहिलेले आहे, त्या आपणासाठीसुद्धा ते नीतिमत्व म्हणून गणले जाणार आहे.