पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| आता, बंधूंनो आणि भगिनींनो, आत्मिक दानांसंदर्भात तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. |
| 2 |
| तुम्हाला आठवतच असेल की तुम्ही गैरयहूदी होता, तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारे का होईना मुक्या मूर्तींच्या प्रभावाखाली भटकले गेला होता. |
| 3 |
| याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही. |
| 4 |
| निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे. |
| 5 |
| सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. |
| 6 |
| कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत. |
| 7 |
| आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते. |
| 8 |
| एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचा संदेश, तर तोच दुसर्याला बुद्धीचा संदेश एकाच आत्म्याद्वारे देतो. |
| 9 |
| त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्याला रोग बरे करण्याची दाने मिळतात. |
| 10 |
| तोच आत्मा काही जणांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य देतो, तर इतर काही जणांना संकल्प सांगण्याचे, तर कित्येकांना आत्मे ओळखण्याचे सामर्थ्य देतो. आणखी काहींना तो अन्य भाषा बोलण्याचे ज्ञान देतो; आणि त्याचप्रमाणे इतरांना अन्य भाषेचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता देतो. |
| 11 |
| ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो. |
| 12 |
| जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे. |
| 13 |
| काही यहूदी किंवा गैरयहूदी, काही गुलाम किंवा स्वतंत्र, आपण सर्व एकाच आत्म्याद्वारे एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा पावलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकाला एक आत्मा प्यावयास दिला आहे. |
| 14 |
| आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे. |
| 15 |
| समजा पाय म्हणाला, “मी हात नाही म्हणून शरीराचा अवयव नाही,” तरी त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. |
| 16 |
| तसेच कानाने म्हटले, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही,” तर त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. |
| 17 |
| सर्व शरीर केवळ डोळा असते, तर ऐकावयास कसे आले असते? किंवा जर संपूर्ण शरीर केवळ कानच असते, तर वास कसा घेता आला असता? |
| 18 |
| परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे. |
| 19 |
| ते केवळ एकच भाग असते, तर शरीर कुठे असते? |
| 20 |
| तर मग अनेक अवयव आहेत, परंतु शरीर मात्र एकच आहे. |
| 21 |
| डोळा हातास म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तकही पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” |
| 22 |
| उलट शरीराचे अशक्त म्हणून समजले जाणारे अवयवही अत्यावश्यक आहेत. |
| 23 |
| आपल्याला वाटते की शरीरामध्ये काही भाग कमी मानाचे आहेत तरी त्यांना आपण विशेष सन्मानाने वागवितो आणि तुच्छ गणले गेलेल्या अवयवांना सुरूप करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. |
| 24 |
| सुरूप दिसणार्या अवयवांची अशी काळजी घेण्याची गरज नसते. म्हणून परमेश्वराने आपल्या शरीराचे निरनिराळे भाग अशा रीतीने जोडले आहेत की जे भाग एरवी कमी महत्त्वाचे वाटतात, त्यांचा मोठा सन्मान केला जावा. |
| 25 |
| ते अशासाठी की शरीरामध्ये फूट नसावी, तर सर्व अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. |
| 26 |
| जर एका अवयवाला दुःख झाले, तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना दुःख होते आणि एका अवयवांचा सन्मान झाला, तर सर्व अवयव आनंदित होतात. |
| 27 |
| आता आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण त्याचे भाग आहोत, |
| 28 |
| आणि परमेश्वराने सर्वात प्रथम मंडळीत प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, मग चमत्कार करणारे, तसेच रोग बरे करण्याचे दान प्राप्त झालेले, इतरांना मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, आणि शेवटी वेगवेगळी भाषा बोलणारे. |
| 29 |
| सर्व प्रेषित आहे काय? सर्व संदेष्टे आहेत काय? सर्व शिक्षक आहेत काय? प्रत्येकाला चमत्कार करण्याचे दान मिळाले आहे काय? |
| 30 |
| सर्वांना रोग बरे करण्याची दाने मिळाली आहेत काय? सर्वजणांना अन्य भाषेत बोलतात काय? सर्वजण स्पष्टीकरण करतात काय? |
| 31 |
| तेव्हा अधिक उच्चदानांची इच्छा बाळगणे चांगले. आणि आता मी तुम्हाला सर्वोत्कृष्ट मार्ग दाखवितो. |
|
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/1corinthians/012.mp3
16
12