कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हास अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच अराम नईराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला पैसे देऊन त्यांनी त्यास तुम्हास शाप द्यायला लावले.
कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याद्वारे शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्यासोबतच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हास सोडून जायचा.
पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या. कारण तुमचा देव परमेश्वरास अशा व्यक्तीचा विट आहे.
आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याज लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारू नका.
परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या देशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.