एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे.
तर तिला घालवून देणार्या पहिल्या नवर्याने ती भ्रष्ट झाल्यामुळे तिला पुन्हा बायको करून घेऊ नये, कारण परमेश्वराला ह्या गोष्टीचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्या देशाला पापदोष लागण्यास कारण होऊ नकोस.
एखाद्या पुरुषाचे नुकतेच लग्न झाले असल्यास त्याने सैन्याबरोबर मोहिमेवर जाऊ नये, अथवा काहीही कामगिरी त्याच्यावर टाकण्यात येऊ नये; त्याने वर्षभर घरीच राहावे आणि आपल्या बायकोला रंजवावे.
आपल्या एखाद्या इस्राएल बांधवाला कोणी चोरले आणि तो त्याला दासाप्रमाणे वागवताना किंवा विकताना आढळला, तर त्या चोराला जिवे मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
सूर्य मावळत आहे तोच त्याचे तारण त्याला अवश्य परत कर म्हणजे तो आपले वस्त्र अंगावर घेऊन निजेल आणि तुझे अभीष्ट चिंतील; आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुझे नीतिमत्त्व ठरेल.
त्याला ज्या दिवसाची मजुरी त्याच दिवशी दे, कारण तो गरीब असल्यामुळे त्याचे सारे लक्ष मजुरीकडे लागलेले असते. ती सूर्यास्तापलीकडे ठेवू नकोस. ठेवलीस तर तो तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्हाणे करील आणि तुला पाप लागेल.
तू आपल्या शेतातील पीक कापशील तेव्हा जर शेतात एखादी पेंढी चुकून राहिली तर ती आणायला परत जाऊ नकोस; उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी ती राहू दे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामात तुला आशीर्वाद देईल.