परमेश्वर मला म्हणाला, त्यास भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच याचेही करा.
रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे.
“तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे.
गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.” बाशान म्हणजे ओगचे राज्य त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात (ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात.
मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला. आणि बाशानाला आपले नाव दिले म्हणून आजही लोक त्यास हव्वोथ-याईराची नगरेच म्हणतात.)
तसेच किन्नेरेथापासुन अरबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ईथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पुर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.
त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश “तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे.
आणि तुमच्याचप्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल, व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देनेपलीकडचा देश तेही ताब्यात घेतील; त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हास दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या.”
मग मी यहोशवाला असे सांगितले की, “या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील.
पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्वकाही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस.
यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्यास उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांस पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहण्यासाठी मिळवून देईल.”